|| अविनाश कवठेकर

बंडखोरी शमवण्यात भाजपला यश:- वडगावशेरीतील विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांना शांत करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला यश आल्यामुळे या मतदारसंघातील लढत भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही लढत सरळ असल्याचे दिसत असले तरी राजकीय समीकरणे आणि पक्षांतर्गत मतभेद यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे राहणार आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी सुनील टिंगरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. यंदा मात्र त्यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून जगदीश मुळीक यांच्यापुढे आव्हान निर्माण करणार का, याबाबत उत्सुकता आहे.

वडगावशेरी विधानसभा मतदार संघातून यापूर्वी महायुती विरोधात आघाडी अशी लढत झाली होती. सन २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमदेवार या मतदारसंघात स्वतंत्रपणे लढले होते. भाजपचे आमदार जगदीश मुळीक सन २०१४ मध्ये विजयी झाले असले तरी त्यांना संघर्ष करावा लागला होता. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले मात्र गेल्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेत असलेले सुनील टिंगरे यांनी त्यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. मात्र यावेळच्या निवडणुकीतील चित्र आणि राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ही लढत दोन पक्षात होणार असल्याचे दिसत असले तरी अंतर्गत आव्हानांचा मोठा सामना दोन्ही पक्षांना करावा लागण्याची शक्यता आहे.

वडगावशेरी मतदारसंघावर शिवसेनेकडूनही हक्क सांगण्यात आला होता. मात्र जागा वाटपात शिवसेनेला हा मतदारसंघ मिळू शकला नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी गटनेता आणि नगरसेवक संजय भोसले यांनी या मतदारसंघातून बंडखोरी केली. मात्र त्यांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. या मतदारसंघात सध्या महायुतीचे सतरा नगरसेवक आहेत. त्यापैकी चौदा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असून तीन नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे केवळ सहा नगरसेवक येथे आहेत. काही वर्षांपर्यंत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे वर्चस्व होते. मात्र सन २०१४ पासून भाजपची ताकद वाढल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या मतदारसंघातील काही राजकीय गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाकडून जवळपास ४० हजार सभासद नोंदणी करण्यात आली आहे. शिवसेनेतही दोन गट असून एका गटाने जगदीश मुळीक यांना पाठिंबा दिला आहे, तर बंडखोर उमेदवार संजय भोसले हे येत्या दोन दिवसांत भाजपच्या प्रचारात सहभागी होतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुनील टिंगरे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यांना तिकिट दिले जाईल, असेही सांगितले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी या मतदारसंघातील निवडणूक ही भाजप-शिवसेना अशीच झाली होती. मात्र टिंगरे अवघ्या काही हजार मतांनी पराभूत झाले होते.

या वेळी ते राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी त्यांना पक्षातूनच छुपा विरोध सुरू आहे. पठारे समर्थकांकडून त्यांना पक्षांतर्गत विरोध होईल, अशी चर्चा आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचेकाही महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपची ताकदही वाढल्याचे दिसत आहे.

उमेदवार तेच, मुद्देही तेच

गेली विधानसभा निवडणूक मुळीक, टिंगरे यांनी एकमेकांविरोधात लढविली होती. तेच पाच वर्षांनंतर पुन्हा रिंगणात आहेत. उमेदवारांबरोबरच प्रचाराचे मुद्देही तेच राहिले आहेत. पाणीप्रश्न, वाहतूक समस्या, महिलांची सुरक्षितता, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना, मेट्रो असेच प्रचाराचे मुद्दे राहणार आहेत.