२१ मतदार संघांतून तीन कोटी ९० लाख २७८ रुपये जप्तह्ण

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी पर्वती मतदार संघातून सर्वाधिक २१ लाख २३ हजार ३१० रुपये जप्त करण्यात आले आहेत. शहरासह जिल्ह्य़ातील २१ मतदार संघांच्या क्षेत्रातून तीन कोटी ९० लाख २७८ रुपये जप्त केले आहेत. तर, आचारसंहिता भंगचे एक हजार १८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केली. आचारसंहिता अबाधित ठेवण्यासाठी गस्ती, स्थिर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे.

या पथकांनी पर्वती मतदार संघात २१ लाख २३ हजार ३१० रुपये जप्त केले आहेत. खडकवासला मतदार संघातून सात लाख ४० हजार रुपये जप्त केले आहेत. शहरातील आठपैकी सर्वाधिक रोकड पर्वती मतदार संघातून जप्त केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदार संघातून दोन लाख रुपये जप्त केले आहेत. तर, ग्रामीण भागातील पुरंदरमधून ९४ हजार ३८० रुपये, दौंडमधून ३० लाख रुपये, इंदापूरमधून दोन लाख रुपये आणि खेड आळंदीमधून पाच लाख रुपये जप्त केले आहेत. आतापर्यंत शहरासह जिल्ह्य़ातून तीन कोटी ९० लाख २७८ रुपये जप्त केले आहेत. त्यामध्ये भरारी पथकाने नऊ लाख ४० हजार रुपये, टेळहणी पथकाने ६० लाख दहा हजार ६९० रुपये, पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन कोटी २० लाख ४३ हजार ५५८ रुपये आणि इतर सहा हजार ३० रुपये जप्त केले आहेत.

दरम्यान, आचारसंहिता जाहीर झाल्यापासून शासकीय इमारतींच्या आवारातील सहा हजार ५११, सार्वजनिक ठिकाणांवरून १४ हजार ९७९ आणि खासगी जागांवरून सहा हजार ४२२ असे एकूण २७ हजार ९१२ राजकीय फलक हटवण्यात आले आहेत.

एक हजार १८७ गुन्हे दाखल

आचारसंहिता काळात पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि ग्रामीण भागातील दहा अशा एकूण २१ विधानसभा मतदार संघांच्या क्षेत्रात एक हजार १८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ४०९, पुणे पोलिसांकडून १८०, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ३३० आणि ग्रामीण पोलिसांकडून २४३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.