मतदान घटल्याची जबाबदारी राजकीय पक्षांनी झटकली

विधानसभा निवडणुकीत मोठय़ा संख्येने मतदान करावे यासाठी सर्व आघाडय़ांवर जनजागृती करूनही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. त्याचे खापर राजकीय पक्षांनी मतदार याद्या आणि निवडणूक यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर फोडले आहे. सदोष मतदार याद्या, मतदार केंद्रांची माहिती न मिळणे आदी कारणांमुळे मतदानाची टक्केवारी घटली, असे समर्थन आता राजकीय पक्ष करत आहेत.

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान झाले. मात्र मतदानाची टक्केवारी कमालीची खालावल्याचे चित्र आकडेवारीवरून पुढे आले आहे. आठ विधानसभा मतदारसंघात मिळून ४६.६८ टक्के मतदान झाले असून एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकी एवढेही मतदान विधानसभेसाठी होऊ शकले नाही. या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी या संदर्भात संवाद साधला असता मतदानाची टक्केवारी घटण्यास सदोष मतदार याद्या कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला. घटलेल्या मतदानाचे खापर राजकीय पक्षांनी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक शाखेवर फोडले.

यंदा मध्यमवर्गीय सुशिक्षित मतदारांकडून बऱ्यापैकी मतदान झाले. मतदान वाढावे यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. यंदा मतदार याद्यांत अनेक नावे दुबार होती. ती वगळण्यात आलीच नाहीत. त्यामुळे याद्यांची तपासणी केल्यानंतर मतदान कमी झाल्याचे दिसून येते. अनेकांना मतदान केंद्रांचीही माहिती वेळेवर होत नाही. मतदान चिठ्ठय़ांचे (स्लिपांचे) वाटपही मतदानाच्या दिवशी आधी होते. हे सर्व घटक मतदान कमी होण्यास कारणीभूत आहेत. माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष, भाजप

मतदारांना वेळेवर चिठ्ठय़ा पोहोचल्या नाहीत. मतदान केंद्रांची माहितीही मतदारांना वेळेत मिळाली नाही. सदोष याद्यांमुळे मतदान केंद्रेही दूरच्या अंतरावर असल्याने मतदार तिथे जाण्यास टाळाटाळ करतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही मतदार याद्यात घोळ होतो. मतदार यादीत नाव नसणे, दुबार मतदार, स्लिपांचे वाटप करण्यात शासकीय यंत्रणांचे अपयश अशी कारणे मतदानाची टक्केवारी घटण्या मागे आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींची दखल घेऊन अचूक मतदार याद्या तयार करणे अपेक्षित आहे. रमेश बागवे , शहराध्यक्ष, काँग्रेस</strong>

मतदान का घटले याचा विचार करताना प्रशासकीय यंत्रणांचा ढिसाळपणाच मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार असल्याचे दिसते. मतदार याद्यातील घोळ, मतदान केंद्रांची माहिती वेळेवर न मिळणे, घरक्रमांकानुसार याद्या तयार न होणे, पुरवणी यादीचे काम रेंगाळणे अशा काही गोष्टींमुळे मतदाराला मतदान कुठे करायचे हेच वेळेवर समजत नाही. त्याची माहिती मिळत नाही.  मतदारांच्या मतदान केंद्रातही अचानक बदल होतो. ही सर्व प्रक्रिया निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर  होण्यापूर्वीच होणे अपेक्षित असते. मात्र तसे होताना दिसत नाही. पूर्वी राजकीय पक्षांकडून मतदानापूर्वी स्लिपांचे वाटप व्हायचे. आता हे काम शासकीय यंत्रणेकडून होत आहे. मतदान केंद्राबाहेर स्लिपांचे वाटप होते. घरोघरी स्लिपा पोहोचत नाहीत. त्याचाही फटका मतदानाला बसला आहे. चेतन तुपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस