29 January 2020

News Flash

विचाराने मृत्यूपर्यंत जाणे म्हणजे इच्छामरण – विद्या बाळ

आशय सांस्कृतिक आणि चंदावरकर कुटुंबीय यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भास्कर चंदावरकर स्मृती व्याख्यानमाले’त बाळ यांचे रविवारी ‘इच्छामरण’ या विषयावर व्याख्यान झाले.

| July 22, 2013 02:45 am

‘इच्छामरण ही विचाराने मृत्यूपर्यंत जाण्याची गोष्ट आहे. आत्महत्येसारखे ‘मनात आले आणि केले’ असे ते नाही. वृद्धत्वाच्या एका पातळीवर आपल्या आयुष्याचा विचार केल्यानंतर आलेली प्रगल्भता आणि त्यातून आलेली विरक्ती या भावना समजून घेणे आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
आशय सांस्कृतिक आणि चंदावरकर कुटुंबीय यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भास्कर चंदावरकर स्मृती व्याख्यानमाले’त बाळ यांचे रविवारी ‘इच्छामरण’ या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी त्या बोलत होत्या.
बाळ म्हणाल्या, ‘‘पक्षाघातासारख्या आजारांमुळे होणारी परावलंबित्वाची जाणीव, आपली जवळची माणसेही केवळ ‘समाज काय म्हणेल’ या भीतीने आपली सेवा करत असल्याचे कळल्यावर होणारे मानसिक खच्चीकरण, अशा अनुभवांमधून ‘या सगळ्यापेक्षा मला सुखाने मरू द्या’ ही भावना निर्माण होऊ शकते. शरीर धडधाकट असतानाही आपण आता जगाला खरोखरच काय देऊ शकतो, या विचारातून इच्छामरणाचा पर्याय समोर येऊ शकतो. आपल्या देशात ही संकल्पना कायद्याने मान्य नसली तरी स्वित्झरलँडसारख्या देशात त्याला मान्यता आहे. अर्थात इच्छामरणात त्या व्यक्तीच्या मनाची ग्वाही हीच सर्वात महत्त्वाची असते. इच्छामरणासाठी विचारपूर्वक अर्ज करणे, तज्ज्ञांशी त्याबद्दल चर्चा करण्यास सहा महिन्यांचा अवधी घेणे या गोष्टी अभिप्रेत आहेत. या अवधीत काही जणांची इच्छामरणाची उबळ शमण्याचीही शक्यता असते. मृत्यूबरोबरच ‘प्रेम’ या संकल्पनेचाही आपण फेरविचार करणे आवश्यक आहे. आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीस सुखा-समाधानाने मरायचे आहे; मात्र,आपल्याला ती व्यक्ती जिवंत राहायला हवी आहे, हा स्वार्थी विचार आहे. जन्मणे आपल्या हातात नसले तरी मृत्यू आपल्या हातात असायला हवा.’’

First Published on July 22, 2013 2:45 am

Web Title: vidya bals speech on euthanasia
Next Stories
1 लोकप्रतिनिधींचा विकासनिधी, खर्चाची चिंता, आचारसंहितेची धास्ती अन् पोलीस आयुक्तांचा संकल्प
2 खडकवासला आणि पवना धरणातून आज पाणी सोडणार
3 दवाखाना सुरू करण्याच्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक
Just Now!
X