श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

दुसऱ्याच्या व्यंगावर बोट ठेवू नये ही संस्कारक्षम शिकवण तुम्हा आम्हा सर्वानाच लहानपणापासून मिळालेली असते. अशा विविध संस्कारांबरोबरच पुढे जात असताना, जर एखादी व्यक्ती एखाद्या शारीरिक समस्येने ग्रस्त असेल तर तिच्याकडे केवळ सहानुभूतीने न पाहता, तिला स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून मार्गदर्शन करायचे, प्रशिक्षण द्यायचे हा त्याच्यापुढचा संस्कार. या संस्कारांनी कार्यरत असणारे मूक बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्र. या केंद्रातील मुलांना व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून प्रशिक्षण दिले जाते.

एखाद्यात कोणतेही व्यंग जन्मत:च असेल किंवा कालौघात काही कारणांमुळे ते आले तर त्या व्यंगावर मात करण्यासाठी त्या व्यक्तीसाठी गरज असते सुयोग्य प्रशिक्षणाबरोबरच स्वाभिमानाची. त्या व्यक्तिचा स्वाभिमान दुखावला गेल्यास आधीच असलेल्या शारीरिक हानीमध्ये मानसिक हानीची भर पडते आणि ती व्यक्ती एकतर निगरगट्ट तरी होते किं वा लाचार तरी. या दोन्हींपासून दूर राहात कर्णबधिर हे अपंगत्व असलेल्या मुलांमधील स्वाभिमान हा गुण विकसित होण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजअभ्यासक कै. पु. ग. वैद्य यांनी मूक बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्राची १९९०  रोजी स्थापना केली.

हे केंद्र द्विस्तरीय असून त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीचे वर्ग संस्थेतर्फे चालविले जातात. तसेच व्यवसाय शिक्षण विभागाच्या सहकार्याने इलेक्ट्रिकल मेंटेनन्स व संगणक डी. टी. पी. हे वर्ग चालविले जातात. या विभागातील विद्यार्थी निन्म आर्थिक स्तरातील असतात. केवळ पुण्यातीलच नाही, तर परगावहूनदेखील विद्यार्थी या वर्गासाठी येतात. या परगावहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची तसेच शैक्षणिक खर्चाची तरतूद करणे पालकांना आर्थिकदृष्टय़ा शक्य नसते. अशा परगावहून येणाऱ्या दहा विद्यार्थ्यांची सोय ‘विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात’ मागील दहा वर्षांपासून करण्यात येते. तेथे राहून हे विद्यार्थी आपला भावी काळ सुयोग्य पद्धतीने व्यतीत व्हावा म्हणून विद्या महामंडळ संस्थेच्या  मूक बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रात प्रशिक्षण घेतात. या कालावधीत विद्यार्थी सहायकच्या वसतिगृहातील सर्व सदस्य, इतर विद्यार्थी कर्णबधिर  विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करतात.

या विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देत असताना कमी भांडवलामधील विविध उपक्रमांची माहिती दिली जाते. विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहावे हेच या संस्थेतील सर्व प्रशिक्षकांचे ध्येय असते. त्यामुळे पणत्या, विद्युत माळा, पाकिटे, भेटकार्ड, टेबल मॅट, क्रिस्टल दिवे, रांगोळया, भरतकामाचे रुमाल, लग्न पत्रिका, प्रमाणपत्रे, व्हिजिटिंग कार्ड, कॅलेंडर्स, प्रश्नपत्रिका आदी कामे येथील विद्यार्थ्यांना शिकवली जातात. यातूनच  विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत होते. यंदाच्या वर्षी काही बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी दिवाळीची भेट म्हणूल विजेवरील बल्बच्या माळा दिल्या होत्या. त्या सर्व माळांची निर्मिती या विद्यार्थ्यांनी केली होती. त्या सर्व माळांच्या विक्रीतून आलेली रक्कम त्या-त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. विविध देणगीदारांबरोबरच आपटे प्रशालेचा माजी विद्यार्थी सुयश टिळक संस्थेच्या कार्यात मदत करतात. चंद्रकांत शिरोळे हे संस्थेचे अध्यक्ष असून प्रशासकीय मंडळात अश्विनी जोशींसह त्यांचे सहकारी या विभागाच्या कार्यात कटिबद्ध आहेत.

कर्णबधिरांची राज्यस्तरीय कार्यशाळा

कर्णबधिर विद्यार्थ्यांचा विकास व पुनर्वसनासाठी संस्था वेगवेगळे उपक्रम सातत्याने करत आहे. याचाच भाग म्हणून २७ व २८ फेब्रुवारी असे दोन दिवस कर्णबधिर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी गणित व सायन्सची कार्यशाळा या निमित्ताने घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील कर्णबधिर शाळांमधील एक शिक्षक व बारा वर्षांवरील तीन विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी हो शकतील. त्यांची राहण्याची, जेवणाची सोय संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक केंद्र, घोले रोड येथे होणाऱ्या या कार्यशाळेबरोबरच सायन्स पार्क, चिंचवड तसेच आयुका येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस सर्व शाळांतील मिळून साधारणपणे शंभर शिक्षक व विद्यार्थ्यांची सोय जवळपासच्या कार्यालयात करण्यात येणार असल्याचे महामात्र डॉ. अ.ल.देशमुख यांनी या निमित्ताने सांगितले. विद्या महामंडळ संस्थेचे मूक बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्र हे आपटे प्रशाला, आपटे रस्ता येथील प्रांगणात असून (०२०) २५५३८१६१  किंवा ९८२२७६२३४१ या क्रमांकावर संपर्क साधून संस्थेबद्दलची अधिक माहिती तसेच कार्यशाळेत सहभागी होण्यासंदर्भातील माहिती घेता येईल.