श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारी संस्था म्हणजे ‘विद्यादान सहायक मंडळ’. एका दहावीच्या विद्यार्थ्यांने उत्तम गुण संपादित करूनही आर्थिक चणचणीबरोबरच अनेक अडचणी त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होत्या. त्यावर मात कशी करायची याचा मार्गच त्या विद्यार्थ्यांला सापडेना. त्यावेळी भाऊ नानिवडेकर आणि काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे ठरविले आणि या सेवाभावी संस्थेचे कार्य सुरू झाले.

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

एखाद्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांला सुयोग्य शिक्षण मिळावे यासाठी झटणारी काही मंडळी एकत्र आली. शिक्षणानेच उत्तम समाज घडविता येतो यावर विश्वास असणाऱ्या या एकत्र आलेल्या मंडळींनी २००८ मध्ये ‘विद्यादान सहायक मंडळा’ची स्थापना केली. या मंडळाद्वारे गरजू, गुणवंत आणि होतकरू या निकषांवर विद्यार्थ्यांची काटेकोर निवड केली जाते. मात्र त्यांना केवळ आर्थिक साहाय्य करण्यापुरते मर्यादित न राहता संस्था त्यांचे पालकत्वही स्वीकारते. निवड केलेल्या मुलांच्या आशा आकांक्षा तसेच गरजा लक्षात घेऊन वर्षभरात विविध उपक्रमांचे नियोजन केले जाते. भौगोलिक विस्तारानुषंगाने दोनशे ऐंशी विद्यार्थी, दोनशे पन्नास माजी विद्यार्थी, दोनशे पंचवीस कार्यकर्ते असलेल्या या मंडळाचा पुण्यासह ठाणे, बोरिवली, शहापूर, नागपूर अशा पाच शाखांमध्ये विस्तार झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीकडे मंडळातील संचालकांचे लक्ष असते. यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येते. विद्यार्थी कुठल्याही जिल्ह्य़ातील असला तरी त्याला जवळ असलेल्या शाखेशी जोडून घेतले जाते. मंडळाच्या विविध उपक्रमांमधून तसेच निवासी शिबिरांमधून विद्यार्थ्यांच्या मुक्त अभिव्यक्तीला वाव दिला जातो. अभियांत्रिकी विषयांशी संबंधित कार्यशाळा, उद्योजकता विकास कार्यशाळा अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढेल याकडे लक्ष दिले जाते. शास्त्र, वैद्यकीय, नर्सिग, अभियांत्रिकी, वाणिज्य, उपयोजित कलाशाखा अशा विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी व्यवसाय मार्गदर्शनासंबंधी कार्यशाळांचे आयोजन मंडळातर्फे केले जाते.

शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच कार्यक्रमांचे तपशीलवार वेळापत्रक विद्यार्थी तसेच कार्यकर्त्यांना दिले जाते. त्यामुळे तपशिलाचा अभ्यास करून विद्यार्थी आणि कार्यकर्ते स्वत:ला योग्य ठरतील असे कार्यक्रम निवडतात. मदतकक्ष ही एक विद्यादानची अत्यंत उपयुक्त आणि तत्परतेने चालवली जाणारी यंत्रणा. व्हाट्स अ‍ॅप ग्रुप तसेच गूगल ग्रुपमुळे कार्यकर्त्यांच्या प्रश्नाचे/शंकांचे त्वरित निराकरण करण्याचे कार्य या यंत्रणेद्वारे केले जाते.  विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आलेखासाठी मासिक तसेच वार्षिक अहवालातून पुढील वर्षीच्या प्रवेशाबद्दल निर्णय घेतला जातो. कार्यकर्ता पालक ही विद्यादानाची मूलभूत संकल्पना. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांच्या अडचणी समजून घेऊन विविध उपाय सुचवणे व मानसिक आधार देणे हे काम मंडळाचे पालक कार्यकर्ते करतात. ‘विद्यादान’चे कार्यकर्ते विवेकनिष्ठ (आरईबीटी) विचारपद्धतीने विचार करतात आणि तशीच शिकवण विद्यार्थ्यांनाही देतात. कार्यकर्त्यांसाठीदेखील वर्षांतून दोन कार्यशाळा घेतल्या जातात. या कार्यशाळांमध्ये संघबांधणी, मंडळाला अपेक्षित असलेली मूल्ये, कार्यकर्त्यां पालकाला दैनंदिन कामात येऊ  शकणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपायांबाबत मार्गदर्शन केले जाते.

विद्यादान सहायक मंडळाच्या मदतीने शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी अनेक प्रकारे संस्थेशी संलग्न राहतात. मंडळाचे खरे दूत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करणारे मंडळाचे माजी विद्यार्थी. मंडळाचे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट  होऊ  घातले आहेत. तीन वर्षांपूर्वी माजी विद्यार्थी संघ स्थापन झाल्यापासून अधिक भरीव स्वरूपात कार्य करणे मंडळाला शक्य झाले आहे. ते त्यांच्या संपर्कातील लोकांना विद्यादानबद्दल माहिती देतात. गरजू तसेच होतकरू मुलांची नावे मंडळाला सुचवतात. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात.

आजवर समाजातील अनेक गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदतीचा हात देण्यात आला आहे. ढोबळमानाने आज विद्यादानचे कार्यकर्ते शहरी भागातील आहेत. आज सतत विस्तारणारे विद्यादानचे क्षितिज पाहता संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते आणि इतर मदतीचीही गरज आहे. संस्थेच्या कार्यासंबंधी अधिक माहिती हवी असेल, मंडळाला कोणत्याही प्रकारे मदत करायची असेल तर ९३२३९५९४३३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. विद्यादानसारखे पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर विद्यार्थ्यांची निवड करणे अवघड जाते. अशा वेळी विद्यादान मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्ता पालक म्हणून कार्य करणे शक्य आहे, तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन, गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवणे, त्यांच्या पालकत्वाची भूमिका निभावणे असेही काम करता येईल. गरजू, होतकरू विद्यार्थ्यांची माहिती मंडळाला देणे अशा विविध प्रकारे मंडळाच्या कार्यात सहभागी होता येईल.