आघारकर संशोधन संस्था आणि रशियातील संशोधकांचे संयुक्त संशोधन

पुणे : व्हिएतनाममध्ये आढळणाऱ्या करंडक वनस्पतीच्या (डायटम) दोन प्रजाती पश्चिम घाटातील केरळमध्ये आढळल्या आहेत. भारत आणि रशियाच्या संशोधकांनी केलेल्या संयुक्त संशोधनातून ही बाब समोर आली असून, दोन देशांतील करंडक वनस्पतीच्या प्रजातींसंदर्भातील साम्य पहिल्यांदाच दिसून आले आहे.

आघारकर संशोधन संस्था आणि रशियातील के. ए. तिमिऱ्याझेव इन्स्टिटय़ूट ऑफ प्लँट फिजिओलॉजी यांनी केलेले संयुक्त संशोधन ‘फायटोटाक्सा’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. संशोधनात कार्तिक बालसुब्रमण्यन, समाधान पारधी, अन्बुक्कारासू विघ्नेश्वरन, पॅट्रिक कोकिओलेक, अँटन ग्लुश्चेनेन्को, मॅक्झिम कुलिकोवस्की यांचा सहभाग होता. या संशोधनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

आघारकर संशोधन संस्थेतील संशोधक कार्तिक बालसुब्रमण्यन यांनी या संशोधनाची माहिती दिली. एकपेशीय असलेली करंडक वनस्पती हा शेवाळाचा एक प्रकार आहे. त्याला बाहेरून काचेचे आवरण असते. करंडक वनस्पती प्रकाश संश्लेषण करून स्वत:चे अन्न तयार करते. आतापर्यंत करंडक वनस्पतीबाबत विशेष अभ्यास झालेला नाही. करंडक वनस्पतीच्या जगभरात १० लाखांहून अधिक प्रजाती असण्याचा अंदाज असून, त्यापैकी जेमतेम ३० ते ४० हजार प्रजाती ज्ञात आहेत. रशियन संशोधकांनी केलेल्या संशोधनात त्यांना व्हिएतनाममध्ये गोम्फोनेमा कल्लारेन्स आणि गोम्फोनेमा केझलिए या प्रजाती आढळून आल्या होत्या. मात्र त्याच प्रजाती पश्चिम घाटाचा भाग असलेल्या केरळमध्येही आढळून आल्या आहेत. भारतात आढळण्याऱ्या काही प्रजाती दक्षिण आशियातील इतर देशांमध्ये आढळून येतात. त्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वाचे आहे,अशी माहिती त्यांनी दिली.

पाण्याची शुद्धता तपासणे करंडक वनस्पतीद्वारे शक्य

करंडक वनस्पती हा जलीय पर्यावरणातील आणि मानवी दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ पाण्यातले आणि प्रदूषित पाण्यातील करंडक वनस्पती वेगळ्या असतात. करंडक वनस्पतींच्या प्रजातींद्वारे पाण्याची शुद्धता तपासणे शक्य आहे. जैवइंधन तयार करण्यासाठीही करंडक वनस्पतींचा वापर केला जातो. पृथ्वीच्या इतिहासात करंडक वनस्पतींनी ऑक्सिजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अलीकडे मेघालय, अरुणाचल प्रदेशसह पवना, कोयना येथेही अभ्यास करून करंडक वनस्पतीच्या प्रजाती शोधल्या आहेत, असेही बालसुब्रमण्यन यांनी सांगितले.