‘आधुनिक विज्ञान हे पाश्चिमात्यांकडून आलेले नसून भारतीय आध्यात्मातच विज्ञानाची पाळेमुळे सापडतात,’ असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी सोमवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ आणि ‘दीर्घायु’ संस्थेच्या दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात डॉ. भटकर बोलत होते. या वेळी भारत-नेपाळ मैत्री संघाची आणि लोकमान्य आरोग्य मंचाची स्थापनाही करण्यात आली. या वेळी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, नेपाळ येथील गांधी इंटरनॅशनल मिशनचे अध्यक्ष सुशील अग्रवाल, लोकमान्य मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्हि. जी. वैद्य, दीर्घायु अंकाचे व्यवस्थापकीय संपादक दशरथ कुळधरण, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव विकास अबनावे आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. भटकर म्हणाले,‘‘आधुनिक विज्ञान हे पाश्चिमात्यांकडून आले आहे असा सार्वत्रिक समज आहे. मात्र, भारतीय तत्त्वज्ञान आणि आध्यात्मात विज्ञानाचीच पाळेमुळे सापडतात. भारतीय विज्ञानाची सुरूवात ही आध्यात्मापासून होते.’’
या वेळी मानसरोवर यात्रेसाठी नेपाळ सहकार्य करणार असल्याचे सांगून अग्रवाल म्हणाले,‘‘भारतात मानसरोवर यात्रेसाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. त्यासाठी ही यात्रा नेपाळमधून करणे हा चांगला पर्याय आहे. त्यासाठी नेपाळ सरकार संपूर्ण सहकार्य करेल. पहिल्यांदा ४० नागरिकांचा गट ही यात्रा करू शकेल.’’
रामदेवबाबांचा आयुर्वेद जोशी पुढे नेणार..
‘भारतात रामदेवबाबांनी अलीकडे आयुर्वेदाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. नेपाळमध्येही वनौषधी आणि आयुर्वेदाची मोठी परंपरा आहे. आता मोहन जोशी आणि आम्ही मिळून रामदेवबाबांचा आयुर्वेद पुढे नेऊ,’ असे वक्तव्य अग्रवाल यांनी केले आणि सभागृहात खसखस पिकली.