विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता

पुणे : देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा झालेला पाहण्याचे भाग्य लाभलेली वास्तू, अनेक चित्रपटांचा रौप्यमहोत्सव आणि मॅटिनीला इंग्रजी चित्रपट पाहण्यासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींची होणारी गर्दी अशी वैशिष्टय़े असलेले विजय चित्रपटगृह लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. या जागेवर व्यापारी संकुल उभे राहणार आहे.

एकपडदा चित्रपटगृहचालकांची अवस्था बिकट असून आम्हाला चित्रपटगृह बंद करून त्या जागेवर अन्य व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ‘पूना एक्झिबिटर्स असोसिएशन’ या एकपडदा चित्रपटगृहमालकांनी नुकतीच शासनाकडे केली आहे. करोना संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद असल्याचा आर्थिक फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर विजय चित्रपटगृह बंद करून त्या जागेवर व्यापारी संकुल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती चित्रपटगृहाचे मालक आणि पूना एक्झिबिटर्स असोसिएशनचे सहसचिव दिलीप निकम यांनी दिली.

लक्ष्मी रस्त्यावरील या वास्तूची पूर्वी लिमये नाटय़ चित्र मंदिर अशी ओळख होती. १९४२ च्या सुमारास स्थापना झालेल्या या मंदिरामध्ये संगीत नाटके सादर होत असत. संगीत रंगभूमीचा काळ ओसरल्यानंतर या रंगमंचावर पडदा उभारून त्याचे चित्रपटगृहामध्ये रूपांतर करण्यात आले. सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या हस्ते विजय चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले होते. नारायण विनायक लिमये यांच्याकडे जागेची आणि चित्रपटगृहाची मालकी होती. त्यानंतर १९७२ च्या सुमारास त्यांनी जोशी कुटुंबीयांना भाडय़ाने चित्रपटगृह चालविण्यासाठी दिले. आम्ही २००६ मध्ये २० हजार चौरस फुटांची ही माललत्ता विकत घेतली आणि २०१२ मध्ये विजय चित्रपटगृह चालविण्यास सुरुवात केली. पहिली तीन वर्षे चित्रपटगृह चांगले चालले. नंतर मल्टिप्लेक्सच्या जमान्यामध्ये एकपडदा चित्रपटगृहांना फटका बसला, असे निकम यांनी सांगितले.

देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन १४ ऑगस्टच्या मध्यरात्री लिमये नाटय़ चित्र मंदिराच्या वास्तूमध्ये साजरा झाला होता. सुलोचना, रमेश देव आणि सीमा यांची भूमिका असलेल्या ‘मोलकरीण’ चित्रपटगृहाने उत्तम व्यवसाय केला होता. मॅटिनीला उत्तम इंग्रजी चित्रपटगृह दाखविण्याची प्रथा विजय चित्रपटगृहाने सुरू केली. त्या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आवर्जून तास बुडवून चित्रपट पाहण्यासाठी येत असत.

चित्रपटगृहाविना व्यापारी संकुल

चित्रपटगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल निर्माण करताना छोटे चित्रपटगृह ठेवले पाहिजे, अशी अट सध्याच्या कायद्यामध्ये आहे. मात्र, चित्रपटगृहाविना व्यापारी संकुल करता यावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिलीप निकम यांनी सांगितले. कोणत्याही चित्रपटगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल करताना तीनशे आसनक्षमता किंवा सध्याच्या चित्रपटगृहामध्ये असलेल्या आसनक्षमतेच्या एक तृतीयांश यापैकी अधिक असलेल्या आसनक्षमतेचे चित्रपटगृह केले पाहिजे, अशी  कायद्यामध्ये अट आहे. नटराज चित्रपटगृहाच्या जागेवर उभे राहिलेल्या व्यापारी संकुलातील चित्रपटगृह वापराविना पडून आहे.