सरकार बदलले, मंत्री बदलले की प्राधान्यक्रम कसे बदलतात, याची प्रचिती पुणे जिल्ह्य़ातील धरणांच्या कामांच्या प्राधान्यक्रमावरून सध्या पाहायला मिळत आहे. गेली कित्येक वर्षे जलसंपदा विभागावर बारामतीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व असताना बारामती, फलटण आणि काही प्रमाणात माळशिरस या तालुक्यांवर मेहरनजर होत होती. आता पहिल्यांदाच हे प्राधान्यक्रम बदलताना दिसत असून, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यामुळे पुरंदर तालुक्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या योजना मार्गी लागण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच १७ वर्षांपूर्वी काम सुरू होऊनही अपूर्ण राहिलेले गुंजवणी धरण मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
जलसंपदा विभागावर आतापर्यंत पवार कुटुंबीयांचेच वर्चस्व होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गेल्या तीन सरकारांमध्ये काही काळ अजित पवार जलसंपदा मंत्री होते, तर काही काळ त्यांचे विश्वासू सहकारी या खात्याचे मंत्री होते. त्यामुळे बारामती, फलटण, माळशिरस, काही प्रमाणात इंदापूर हे तालुके डोळ्यासमोर धरून धरणांच्या कामांना प्राधान्य दिले जात असे. त्याचा परिणाम म्हणून अलीकडच्या काळात नीरा (देवघर) या ८ टीएमसी क्षमतेच्या धरणाच्या कामाला प्राधान्य होते. त्यामुळे या धरणाचे काम पूर्ण झाले. त्याचा लाभ प्रामुख्याने फलटण, माळशिरस या तालुक्यांना होणार आहे. काही प्रमाणात खंडाळा व भोर तालुक्यांनाही फायदा होणार आहे.
मात्र, त्याच वेळी गुंजवणी धरणाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. या धरणाची नियोजित क्षमता ४ टीएमसी इतकी आहे. आतापर्यंत झालेल्या बांधकामामुळे त्यात केवळ ०.७ टीएमसी इतकेच पाणी साठवता येऊ शकते. त्याची पातळी वाढवली आणि दरवाजे बसवले की ही क्षमता वाढू शकते. ते होताना दोन गावे पाण्याखाली जाणार आहेत. तेथील लोकांच्या पुनर्वसनाबाबत काही मागण्या आहेत. मात्र, ते कारण पुढे करून या धरणाचे काम पुढे गेले नाही. ते झाले आणि कालव्यांची व्यवस्था झाली की त्याचा जास्तीत जास्त फायदा पुरंदर तालुक्याला होणार आहे. या धरणाचे एकूण लाभक्षेत्र १६५०० हेक्टर आहे. त्यात एकटय़ा पुरंदर तालुक्यातील ८५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. उरलेले लाभक्षेत्र भोर व वेल्हा तालुक्यांमध्ये येते. आताचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे पुरंदर मतदारसंघातील आहेत. आपल्या मतदारसंघातील पाण्याची कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

पुरंदर तालुक्याकडे लक्ष
‘‘जलसंपदा विभागाच्या पुणे सर्कलमधील गुंजवणी आणि नीरा-देवघर या धरणांच्या कामांमध्ये आतापर्यंत नीरा-देवघरला प्राधान्य होते. मात्र, आता या धरणाच्या कालव्यांबाबतच्या बैठका फारशा होत नाहीत. त्याऐवजी विभागाचे लक्ष गुंजवणीकडे वळाले. अर्थातच त्यामागे राज्यमंत्री शिवतारे यांचा आग्रह आहे. त्यामुळे पुढील काही काळात गुंजवणीच्या कामांना गती येईल आणि या धरणाचे उरलेले काम मार्गी लागेल. त्याबाबत बैठका वाढल्या आहेत. इतकेच नव्हे तर कालव्यांसाठी जमीन ताब्यात घेण्यास विरोध होऊ शकतो हे विचारात घेऊन हे पाणी बंद नळाद्वारे लाभक्षेत्राकडे पोहोचवण्याची योजना आहे. त्यातून बचत होणारे पाणी ‘नारायणपूर उपसा’ योजनेद्वारे पुरंदर तालुक्यातील उंचावरील गावांना पुरवण्याची शिवतारे यांची योजना आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पुरंदर तालुक्याकडे इतके लक्ष केंद्रित झाले आहे.’’
– जलसंपदा विभागातील सूत्र