लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची भूमिका

मुंबईच्या एल्फिन्स्टन रस्ता येथील रेल्वे पुलाची उभारणी ही लष्करासाठी भूषणावह आहे, अशी भूमिका घेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयाचे गुरुवारी समर्थन केले.

एल्फिन्स्टन रस्ता येथील रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन २२ जणांचे बळी गेले होते. त्यानंतर हा पूल उभारण्याचे काम लष्कराकडे सोपविण्यात आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नागरी भागातील अशा स्वरूपाची कामे लष्कराकडे सोपवावीत का, याबाबत उलटसुलट मते व्यक्त करण्यात येत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर एका कार्यक्रमानिमित्ताने पुण्यात आलेले लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पत्रकारांशी बोलताना या निर्णयाचे समर्थन केले.

रावत म्हणाले, एल्फिन्स्टन रोड पुलासह मुंबईतील अन्य काही पूल उभारण्याचे कामही लष्कराकडून करण्यात येणार आहे. इतर कोणत्याही प्रकारची दुर्दैवी घटना भविष्यात होऊ नयेत म्हणून हे पूल तातडीने बांधण्यात येणार आहेत. पुलाच्या उभारणीचे काम करण्यास लवकरच सुरुवात होईल. अशा स्वरूपाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि निष्पापांचे बळी जाऊ नयेत, असे लष्करास वाटते.

जम्मू-काश्मीरमध्ये संवादसत्र सुरू झाले असले, तरी ही चर्चा आणि ‘ऑपरेशन ऑलआऊट’ हे एकाच वेळी सुरू राहू शकते. त्यामुळे लष्कराची आपल्या परीने धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे बिपीन रावत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, सीमेवरील अशांत वातावरणाचे सावट दूर होऊन तेथे शांतता नांदावी यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांसोबत शिष्टमंडळाद्वारे चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहेत.

मात्र, शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या लष्कराचे ‘ऑपेरशन ऑलआऊट’ सुरू आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू राहू शकतात. सध्या या दोन्ही गोष्टी सुरू आहेत. ज्या लोकांना फुटीरतावादी नेत्यांसोबत बोलणी करावयाची आहेत, त्यांनी त्यांचे काम करावे. त्यासाठी ते मोकळे आहेत. मात्र, त्याचवेळी लष्कर आपल्यापरीने धडक कारवाई करत राहील. त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा खंड पडणार नाही.