चाकण येथील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते विलास दत्तात्रय बारवकर (५३) यांनी राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नातेवाईक, घोटाळेबाज राजकीय कार्यकर्ते आणि चार पोलीस अधिकारी अशा ५२ जणांची नावे लिहिली असून त्यांच्या छळवणुकीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.
यासंदर्भात जावई सुशील शेवकरी म्हणाले, सोमवारी त्यांच्याशी बोललो. माहिती अधिकाराच्या माध्यमातून विविध घोटाळे उघड केल्याबद्दल दुखावल्या गेलेल्या व्यक्तींकडून होत असलेल्या छळवणुकीने त्रस्त झालो असून हे हाताळणे आता अशक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना खोदून विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. ते अतिशय कणखर होते आणि विविध सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दीर्घकाळापासून लढत होते. बारवकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.