राजकीय भूमिकेबाबत मात्र अद्याप अनिश्चितताच

बऱ्याच दिवसांपासून मुख्य राजकीय प्रवाहापासून दूर असलेल्या भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तथापि, आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, कोणती राजकीय भूमिका घेणार, याविषयीची संभ्रमावस्था त्यांनी कायम ठेवली आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून लांडे यांनी स्वत:ला राजकीय प्रवाहापासून दूर ठेवले आहे. सध्या ते राष्ट्रवादीत आहेत. मात्र, पक्षातील सध्याच्या वातावरणात ते राष्ट्रवादीत राहण्यास उत्सुक नाहीत. ते भाजपमध्ये किंवा शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त करणारी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात आहे. तथापि, प्रत्यक्षात कोणतीही कृती त्यांनी केली नाही. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मात्र, पुढील काळात नेमकी कोणती भूमिका घ्यायची, याविषयी लांडे निर्णय घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कमालीची अस्वस्थता आहे. मध्यंतरी आक्रमक झालेल्या त्यांच्या समर्थकांनी भोसरीत बैठक घेतली. अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. तेव्हा आठ दिवसात निर्णय घेऊ, असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली. त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. बोलून कृती न करणे, हा त्यांचा अनुभव समर्थकांच्या दृष्टीने नवीन नव्हता. कारण, ‘बोले तैसा न चाले’ ही विलासरावांची खासियत समर्थकांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. या गोष्टीलाही बरेच दिवस लोटले तरी लांडे यांनी संभ्रमावस्था कायम ठेवली आहे. शहरभरात वाढदिवसाच्या लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांमध्ये या वेळी शरद पवार आणि अजित पवार यांची छायाचित्रे ठळकपणे झळकत होती. त्यामुळे लांडे यांचा राष्ट्रवादीतील मुक्काम वाढवण्याचा विचार आहे का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, त्याच्या नेमकी उलट कृती ते करू शकतात, अशी शक्यता समर्थकांनाच वाटते आहे.