News Flash

विलास लांडे पुन्हा मैदानात

शिरूर लोकसभा, भोसरी विधानसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवून आगामी महापालिका निवडणुकीसाठी विलास लांडे पूर्ण तयारीने पुन्हा मैदानात उतरले आहेत.

बराच काळ भोसरीचे सर्वेसर्वा राहिलेले विलास लांडे यांचा त्यांच्याच भाचेजावयाकडून पराभव झाल्यानंतर सव्वा वर्ष ते अज्ञातवासात असल्याप्रमाणे राहिले. शिरूर लोकसभा, भोसरी विधानसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवून आगामी महापालिका निवडणुकीसाठी पूर्ण तयारीने ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीतच राहायचे की नव्या पक्षाचा टिळा लावायचा, हा निर्णय गुलदस्त्यात ठेवून त्यांनी आपले राजकीय पत्ते टाकण्यास सुरुवात केली आहे.
भोसरी पट्टय़ातील राजकारणावर लांडे यांचे वर्षांनुवर्षे वर्चस्व राहिले आहे. तथापि, त्यांच्याच तालमीत तयार झालेले व नात्याने भाचेजावई असलेले महेश लांडगे यांनी त्यांच्या वर्चस्वाला धक्का दिला. सन २०१४ च्या विधानसभेत दोहोत थेट सामना झाला, तेव्हा लांडे पराभूत झाले. तत्पूर्वी, प्रदीर्घ काळ लांडे-लांडगे संघर्ष सुरू होता. ‘एका म्यानात दोन तलवारी’ असल्याप्रमाणे भोसरीत परिस्थिती होती. अनेकांच्या मते तो संघर्ष ‘नुरा कुस्ती’चा भाग होता. मात्र, सत्ताकारणात नातेसंबंध मागे पडले. तणावपूर्ण वातावरणात झालेल्या लढतीत लांडे पराभूत झाले आणि राजकीय प्रवाहातून बाजूला पडले. इकडे त्यांचे समर्थक सैरभैर झाले. बराच काळ ही अवस्था होती. मात्र, निवडणुकांचे पडघम वाजू लागताच झालं गेलं ‘डोक्यात ठेवून’ लांडे कामाला लागले. पवार कृपेने गरुड भरारी घेतलेल्या लांडे यांची यापुढे राष्ट्रवादीत राहण्याची मानसिकता नाही. भाजप-शिवसेनेपैकी एकाशी सोयरिक करण्याच्या त्यांच्या हालचाली चर्चेत आहेत. जे आपल्या पराभवास कारणीभूत आहेत, त्यांना ‘घरचा रस्ता’ दाखवण्यासाठी आतूर असलेल्या लांडे यांनी वर्षभर आधीच तयारी सुरू केली आहे.
सन २००२ मध्ये पालिका निवडणुकीत तिकीट कापण्यात आल्यानंतर ‘भोसरीत राष्ट्रवादीचे बारा वाजवणार’ अशी घोषणा करून लांडे यांनी भाजपच्या अंकुश लांडगे यांच्या मदतीने राष्ट्रवादीचे भोसरीतील सर्व उमेदवार पाडले होते. मात्र, लांडे यांना शिक्षा होण्याऐवजी त्यांचे ‘उपद्रवमूल्य’ लक्षात घेऊन राष्ट्रवादीने २००४ मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली. गजानन बाबर यांच्यासारखा ‘वाघ’ मारून आमदार झाल्यानंतर १० वर्षे सत्ता उपभोगताना लांडे यांनी ‘जे पेरले, तेच उगवले’ व बालेकिल्ल्यातच पराभूत होण्याची वेळ त्यांच्यावर आली. आता शिरूर लोकसभा आणि भोसरी विधानसभेचे गणित डोळ्यासमोर ठेवून ‘लक्ष्य २०१७’ करिता त्यांनी डावपेचास सुरुवात केल्याने यापुढे भोसरी पट्टय़ातील ‘शर्यत’ रंगतदार होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2016 3:22 am

Web Title: vilas lande target 2017
Next Stories
1 चिकुनगुनियाचे ७२ रुग्ण
2 कुंपणच शेत खाते तेव्हा..
3 रुपी बँक गैरव्यवहार प्रकरणी संचालक, अधिकारी दोषी
Just Now!
X