देहू-आळंदी, चाकण, हिंजवडीसह पिंपरी पालिकेच्या हद्दीलगतची २० गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी पुन्हा तहकूब ठेवला. उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असतानाही संबंधित गावांमधील ग्रामस्थांचा तसेच राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने तूर्त घाई न करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे.
देहू, आळंदी, चाकण, हिंजवडी, विठ्ठलनगर, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंबरे, गहुंजे, माण, मारूंजी, नेरे, जांबे ही गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. शहर सुधारणा समितीसमोर रखडवून ठेवलेला हा प्रस्ताव पालिका सभेतही मंजूर करण्यात येत नाही. कोणतीही चर्चा न होता हा प्रस्ताव शनिवारी पुन्हा तहकूब ठेवण्यात आला. गावांचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अथवा फेटाळण्याचा अधिकार सभेला आहे. सभागृहात राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. मात्र, प्रस्तावित गावांमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांचाच पिंपरीत येण्यास नकारघंटा आहे. यापूर्वी समाविष्ट गावांची अवस्था लक्षात घेता आम्हाला तिथे काहीही भवितव्य नाही, असा त्यांचा सूर आहे. १७ वर्षांनंतरही विकासकामे होत नसल्याची तक्रार या गावांमधून होत असून त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक आघाडीवर आहेत. अजितदादा गावे समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहेत. विकास हवा असल्यास समाविष्ट व्हा, असे त्यांचे गावकऱ्यांना आवाहन आहे. तथापि, विरोधकांसह राष्ट्रवादीतही विरोधी सूर आहे. त्यामुळेच सहज शक्य असतानाही पिंपरी पालिकेत हा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई केली गेली नाही.