रंगभूमीवरील वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या युवा रंगकर्मीना विनोद दोशी पुरस्कार, ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक 20vinod-doshiव अभिनेते गिरीश कर्नाड यांची दोन व्याख्याने आणि नाटय़प्रेमींसाठी बहुभाषिक नाटय़महोत्सव असा नाटय़प्रेमी रसिकांसाठी पर्वणीचा सप्ताह शनिवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे.
साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे अमेय वाघ, सागर देशमुख, सागर लोधी, संजुक्ता वाघ आणि केतकी थत्ते या पाच युवा रंगकर्मीना यंदाचा विनोद दोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. घरकुल लॉन्स येथे शनिवारी (२१ फेब्रुवारी) सायंकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते या रंगकर्मीना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रत्येकी एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून बारा धनादेशांद्वारे ही रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात दिली जाते. या रकमेचा विनियोग रंगकर्मीने आपल्या प्राधान्यक्रमानुसार करावयाचा असून त्याचा कोणताही हिशेब प्रतिष्ठानला सादर करावयाचा नाही हेच या पुरस्काराचे वैशिष्टय़ आहे.
विनोद आणि सरयू दोशी फाउंडेशनतर्फे सोमवारपासून (२३ फेब्रुवारी) पाच दिवसांचा बालगंधर्व रंगमंदिर येथे बहुभाषिक विनोद दोशी नाटय़महोत्सव रंगणार आहे. हिंदूी-राजस्थानी भाषेतील जयपूर येथील उजागर ड्रॅमॅटिक असोसिएशनच्या ‘कसुमल सपनो’ नाटकाने या महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. मंगळवारी (२४ फेब्रुवारी) फ्लिन थिएटरतर्फे ‘सी शार्प सी ब्लंट’ हा इंग्रजी नाटय़प्रयोग, बुधवारी (२५ फेब्रुवारी) महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे ‘अपराधी सुगंध’ हा मराठी नाटय़प्रयोग, गुरुवारी (२६ फेब्रुवारी) इंडियन आँसाँब्ल आणि रियाद महमूद एज्युकेशन अँड आर्ट्स फाउंडेशनतर्फे ‘कौमुदी’ हा हिंदूी नाटय़प्रयोग होणार आहे. इस्मत चुगताई यांच्या तीन कथांवर आधारित मोटली थिएटर ग्रुपतर्फे सादर होणाऱ्या ‘इस्मत आपा के नाम’ या नाटय़प्रयोगाने विनोद दोशी नाटय़महोत्सवाची सांगता होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, रत्ना पाठक-शहा आणि हीबा शहा यांचा सहभाग असलेल्या या नाटकासाठी विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले आहे. संजीव अभ्यंकर आणि रेखा भारद्वाज यांनी पाश्र्वगायन केले असून मधुकर धुमाळ यांचे सनईवादन ही या नाटय़प्रयोगाची वैशिष्टय़े आहेत.
 
गिरीश कर्नाड यांची व्याख्याने
प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सहकार्याने विनोद दोशी पुरस्काराच्या निमित्ताने रविवारी (२२ फेब्रुवारी) ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कर्नाड यांच्या दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सकाळी सव्वा दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ‘स्ट्रक्चर ऑफ प्ले’ या विषयावर कर्नाड बोलणार आहेत. हे व्याख्यान निमंत्रितांसाठीच आहे. मात्र, गरवारे महाविद्यालयाचे सभागृह सायंकाळी सहा वाजता कर्नाड यांचे ‘मॉडर्न इंडियन कल्चर’ या विषयावरील व्याख्यान सर्वासाठी खुले आहे.