05 July 2020

News Flash

पाच युवा रंगकर्मीना ‘विनोद दोशी पुरस्कार’

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे अमेय वाघ, सागर देशमुख, सागर लोधी, संजुक्ता वाघ आणि केतकी थत्ते या पाच प्रतिभावान युवा रंगकर्मीना यंदाचा ‘विनोद दोशी पुरस्कार’ जाहीर झाला

| February 3, 2015 03:03 am

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे अमेय वाघ, सागर देशमुख, सागर लोधी, संजुक्ता वाघ आणि केतकी थत्ते या 2amey-waghपाच प्रतिभावान युवा रंगकर्मीना यंदाचा ‘विनोद दोशी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रत्येकी एक लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.
या पुरस्काराचे यंदाचे दहावे वर्ष असून आतापर्यंत ४२ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. घरकुल लॉन्स येथे २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते या रंगकर्मीना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त अशोक कुलकर्णी आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या पुरस्कारासाठी विनोद आणि शरयू दोशी फाउंडेशनकडून प्रतिष्ठानला दरवर्षी पाच लाख रुपयांची देणगी 2sanjukta-waghमिळते. प्रत्येकी एक लाख रुपयांचा हा पुरस्कार शिष्यवृत्ती स्वरुपाचा असून त्यासाठी पुरस्कारविजेत्याला अर्ज करावा लागत नाही. त्याचप्रमाणे हा पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकार आपल्या इच्छेनुसार ही रक्कम खर्च करू शकतो. या पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम कलाकारांना १२ धनादेशांद्वारे दिली जाते. त्यामुळे कार्यपद्धतीमध्ये दिरंगाई न होता कलाकारांना मासिक खर्चासाठी हातभार मिळतो, अशी माहिती सतीश आळेकर यांनी दिली.
या पुरस्कारामुळे कोणी तरी आपले काम पाहून त्याला दाद देत आहे याची जाणीव झाली. सुरूवातीच्या काळात हा पाठिंबा आणि प्रोत्साहन महत्त्वाचे असते. ८ हजार रुपये काही जगायला पुरत नाहीत,पण त्या रकमेच्याआधारे प्रवास करणे, पुस्तके विकत घेणे आणि चांगले चित्रपट पाहणे या गोष्टी करता येणे शक्य होते, असे या पुरस्काराचा यापूर्वीचा मानकरी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित टाकळकर याने सांगितले.

गिरीश कर्नाड यांची व्याख्याने
साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्यातर्फे ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांची २२ फेब्रुवारी रोजी दोन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सकाळी सव्वादहा वाजता ‘स्ट्रक्चर ऑफ प्ले’ या विषयावर कर्नाड यांचे नाटय़लेखक आणि रंगकर्मीसाठी व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानास उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी सुदर्शन रंगमंच (दूरध्वनी क्र. २४४३०८०३) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. मात्र, सायंकाळी सहा वाजता  ‘मॉडर्न इंडियन कल्चर’ या विषयावर होणारे व्याख्यान सर्वासाठी खुले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2015 3:03 am

Web Title: vinod doshi awards declared
Next Stories
1 जीविधता महोत्सव उत्साहात साजरा!
2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळावा – डॉ. एस. एन. पठाण
3 ओवेसींच्या पुण्यातील सभेला पोलीसांनी परवानगी नाकारली
Just Now!
X