वकील म्हणून न्यायालयातील आणि माणूस म्हणून मनातील झगडा व्यक्त करणारी सागर देशमुख याने सादर केलेली वसंत आबाजी डहाके यांची ‘प्रतिवादी’ ही कविता.. सागर लोधी याने सादर केलेल्या फ्रान्झ काफका याच्या अनुवादित लघुकथा.. जगण्यातील विरोधाभासावर भाष्य करणाऱ्या धर्मकीर्ती सुमंत याने लिहिलेल्या प्रहसनाचे अमेय वाघ याने केलेले उत्कट सादरीकरण.. ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ आणि ‘कळीदार कपुरी पान’ या लावण्यांच्या गायनासह केतकी थत्ते हिने उलगडलेले लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे चरित्र.. संजुक्ता वाघ हिने ‘उभा विटेवरी’ नाटकातील नृत्याभिनयासह सादर केलेल्या प्रवेशातून संत जनाबाई यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.. अशा शब्द-सुरांनी नटलेल्या कलाविष्कारात विनोद दोशी पुरस्कार रंगला.
साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते सागर देशमुख, सागर लोधी, अमेय वाघ, केतकी थत्ते आणि संजुक्ता वाघ या युवा रंगकर्मीना प्रत्येकी एक लाख रुपयांचा विनोद दोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. विनोद आणि सरयू दोशी फाउंडेशनच्या विश्वस्त सरयू दोशी, विनोद दोशी यांच्या भगिनी शरयू दप्तरी, प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक कुलकर्णी, विश्वस्त सतीश आळेकर आणि सुनील शानभाग हे या वेळी उपस्थित होते.
शरयू दप्तरी यांनी विनोद दोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. सरयू आणि मी, आम्ही शाळेपासूनच्या मैत्रिणी असल्याने ती माझी भावजय व्हावी अशी इच्छा मी प्रदर्शित केली. तिने प्रतिसाद दिला. सरयू माझी भावजय झाली आणि मी तिच्या भावाशी विवाह करून तिची भावजय झाले, असेही शरयू दप्तरी यांनी सांगितले. सरयू दोशी यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. अशोक कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात या शिष्यवृत्तीस्वरूप पुरस्काराची माहिती दिली. अभिनेत्री अश्विनी गिरी यांनी सूत्रसंचालन केले.