पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा गेल्या काही महिन्यांपासून झालेला सुळसुळाट कायम असून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक कारवाई होत नसल्याची तक्रार विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे. आठ दिवसांत त्यांचा ‘बंदोबस्त’ न केल्यास मुख्यालयात मोकाट कुत्री आणून सोडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शाळेत जाणारी मुले, व्यायामासाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक, खरेदीसाठी चाललेल्या महिला, रात्री घरी परतणारे कामगार अशा अनेकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अनेक भागात ही समस्या आहे. नगरसेवकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात, आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा. अन्यथा, महापालिका भवनात कुत्र्यांना सोडू, असे नढे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.