‘‘दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटणे आणि परीक्षेदरम्यान घडणाऱ्या घटनांची चौकशी करण्याचे आदेश दिले असून पुढील परीक्षेपासून असे प्रकार घडू नयेत यासाठी परीक्षेच्या दरम्यान फक्त विद्यार्थ्यांनाच परीक्षा केंद्रावर प्रवेश देता येईल का, पूर्णपणे स्वतंत्र वातावरणात परीक्षा घेता येईल का,’ अशा उपायांची चाचपणी करण्यात येत आहे,’’ असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूटच्या क्रीडा दिवसाच्या कार्यक्रमानंतर तावडे माध्यमांशी बोलत होते. तावडे म्हणाले, ‘‘पूर्वीप्रमाणे आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार आता घडत नाहीत. मात्र, तरीही जे गैरप्रकार सध्या समोर येत आहेत, त्याची चौकशी करण्याचे आदेश संबंधित संस्थांना दिले आहेत. प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहेत, त्यात विद्यार्थी नाहीत, तर इतर घटकांचा सहभाग आहे. त्याची चौकशी करण्यात येईल. या गैरप्रकारांवर काय उपाय करता येतील त्याची चाचपणी करण्यात येत आहे.’’ प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीबाबत तावडे म्हणाले, ‘‘प्रत्येक परीक्षा केंद्राला गाडी देणे, हे व्यावहारिकदृष्टय़ा सध्या शक्य नाही. अशाप्रकारच्या वाहतुकीमध्ये काहीही धोका नाही. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका गहाळ होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येते.’’ राज्यातील शिक्षण मंडळांनाही त्यांचे अधिकार पुन्हा देण्याची शासनाची भूमिका असून त्यासंबंधात सूचनाही दिल्या असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
अभियांत्रिकी पदविका बंद नाही
राज्यात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम कशाला हवेत, असा सवाल विनोद तावडे यांनी विचारला होता. त्याबाबत तावडे यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘‘अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्णपणे बंद करण्याची भूमिका नाही. मात्र, पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे ९० टक्के विद्यार्थी हे पदवीलाच प्रवेश घेणार असतील, तर त्याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने अभ्यासक्रमांत काही बदल करता येतील का, याचा आढावा घेण्यात येईल.’’