पुरातत्त्व संग्रहालय उभारणार, प्रस्तावित प्राणिसंग्रहालयाच्या जागेत प्राचीन अवशेष हाती

नागपूरजवळच्या गोऱ्हेवाडा येथे साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्याच जागेत डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण काळातील अवशेष हाती आले. या ठिकाणाचे पुरातत्त्वीय संग्रहालयात रूपांतर केले जाणार आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालय आणि पुरातत्त्वीय संग्रहालय एकाच ठिकाणी असणारे गोऱ्हेवाडा हे जगातील पहिले ठिकाण ठरेल.

महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ यांच्यामध्ये पुरातत्त्वीय ठिकाणाची जपणूक करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयाच्या प्रस्तावित वनक्षेत्रात हे उत्खनन सुरू होते. या उत्खननात महापाषाणयुगीन अवशेष सापडल्याने त्यांचे आता वस्तुसंग्रहालयात रूपांतर होणार आहे.

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे प्रा. डॉ. कांतीकुमार पवार यांनी ही माहिती दिली. नागपूरपासून दहा किमीवर काटोल रस्त्यावर जुनापाणी, माहुरझरी आणि गोऱ्हेवाडा ही महापाषाण युगीन पुरातत्त्वीय स्थळे अस्तित्वात आहेत. त्यापैकी गोऱ्हेवाडा येथे तीन नोव्हेंबरपासून डेक्कन कॉलेजने उत्खननाचे काम सुरू केले. या स्थळावर बरीच शिलावर्तुळे असून, त्यांचा परीघ सुमारे १७ ते २० मीटर आहे. ही प्राचीन काळातील दफनभूमी असल्याचे उघड होत असून तिथे महापाषाणयुगीन वस्तूही हाती लागत असल्याने संशोधकांचा उत्साह दुणावला आहे.

‘पूर्वीच्या काळात मृत्यूनंतर दहन करण्याची पद्धत नव्हती. तर मृतदेह दफन केले जायचे. महाराष्ट्रात विदर्भातील काही भागांमध्ये प्राचीन काळच्या दफनभूमी आजही अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्येही अशा दफनभूमी आहेत. दफन करण्याच्या पद्धतीला मृत्युधर्म असे म्हटले जाते. दफन करताना त्या व्यक्तीची सामाजिक स्थिती पाहून त्याने वापरलेले साहित्य सोबत पुरले जायचे. गोऱ्हेवाडा येथे तीन दफनांचे उत्खनन सुरू आहे. त्यातून बरीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उत्खननातून मिळणारी लोखंडी अवजारे त्या काळी आशिया उपखंडात तांत्रिकदृष्टय़ा सर्वोत्तम मानली जायची. त्यामुळे गुणवत्तापूर्ण लोखंड निर्मितीचे तंत्रही त्याकाळातील माणसांना अवगत होते, हे सिद्ध होते. त्यामुळे या लोखंडाचाही वेगळा अभ्यास केला जाणार आहे. या दफनांमध्ये मानवी सांगाडे मिळण्याचीही दाट शक्यता आहे.

महापाषाणयुगीन कुऱ्हाडी

या उत्खननात महापाषाण युगीन कुऱ्हाडी, दिवे, बांगडय़ा, मातीची भांडी आदी अवशेष सापडले आहेत. उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासही केला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या या अभ्यासातून अधिक सखोल माहिती मिळणे शक्य होईल.

असे असेल संग्रहालय..

उत्खनन केलेल्या ठिकाणांना काचेचे आवरण देऊन जपले जाणार आहे. तसेच सापडलेल्या वस्तू प्रदर्शनामध्ये मांडल्या जातील. संग्रहालयाच्या दृष्टीने एप्रिलपर्यंत काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर पर्यटकांसाठी हे संग्रहालय खुले होईल, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.