राज्यात करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने गर्दी न करण्याबाबतचे निर्बंध राज्य सरकारकडून घातले जात असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. त्यामुळे सुरक्षित अंतराचा फज्जा उडाल्याचेही दिसून आले.

उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सभागृहात ‘उच्च शिक्षण मंत्रालय @ पुणे’ हा कार्यक्रम गुरुवारी झाला. खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्य प्रवेश परीक्षा कक्षाचे संचालक चिंतामणी जोशी, कला संचालक राजीव मिश्रा, ग्रंथालय संचालनालयाच्या संचालिका शालिनी इंगोले आदी या वेळी उपस्थित होते. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर, नाशिक जिल्ह्य़ातील विद्यार्थी-पालक, शिक्षक, शिक्षके तर कर्मचारी, माजी शिक्षक-कर्मचारी, संघटनांचे प्रतिनिधी असे सुमारे दीड हजार लोकांनी आपले प्रश्न, समस्या मांडल्या.

आपले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी झाली होती. करोना प्रादुर्भावामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मुखपट्टी वापरण्याच्या, सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. प्रश्न मांडण्यासाठी रांग लावण्यात आली असली, तरी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या अतिशय जवळ जावे लागत होते.

तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या खुच्र्याही एकमेकांच्या अतिशय जवळ होत्या. त्यामुळे एकु णात सुरक्षित अंतराचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. एकीकडे पुण्यासह राज्यात करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढत असल्याने राज्य शासनाकडून गर्दी न करण्यासारखे निर्बंध घालण्यात येऊ लागले आहेत. असे असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्याच कार्यक्रमादरम्यान सुरक्षित अंतराचे पालन झाले नाही.

उपक्रमांचा खर्च विद्यापीठांवर नाही

या कार्यक्रमांचा खर्च विद्यापीठांवर टाकण्यात आलेला नाही. मुंबईतील कार्यक्रमासाठीच्या सभागृहाचे भाडे माझ्या निधीतून दिले आहे. त्याची पावती दाखवू शकतो.  विद्यापीठांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडण्याचा प्रश्नच नाही. प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असताना या कार्यक्रमाला विरोध कशाला, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले.