पुणे : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची पुस्तके ही राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ानुसार नसून, मंडळाकडून शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत असल्याचे समोर आले आहे.

देशभरातील सर्व मंडळांचे अभ्यासक्रम हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ानुसार असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने हा आराखडा तयार केला होता. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ानुसार अभ्यासक्रम नसणे हा शिक्षण हक्क कायद्याचा भंग आहे. आयसीएसई मंडळाचा अभ्यासक्रम हा आराखडय़ानुसार नसल्याच्या मुद्दय़ावरून परिषदेने आयसीएसीला नोटीस पाठवली होती. आता महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रमही राष्ट्रीय आराखडय़ानुसार नसल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली. गेल्या वर्षी १३ शाळा संलग्न करण्यात आल्या. यंदा साधारण सत्तर शाळांना संलग्नता देण्यात आली आहे. अनेक खासगी शाळांनी या मंडळाकडे पाठ फिरवल्यामुळे संलग्न शाळांमधील बहुतेक शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. या शाळांसाठी यंदा स्वतंत्र पुस्तके तयार करण्यात आली आहेत.

गेल्या वर्षी या मंडळाची पुस्तके तयार करण्यात आलीच नाहीत. पुस्तके तयार करण्यापूर्वी अभ्यासक्रम आराखडा जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र, आराखडा गोपनीय ठेवण्यात आला. या आराखडय़ानुसार यंदा पहिली ते चौथीला विद्यार्थ्यांसाठी एक आणि शिक्षकांसाठी एक असे पुस्तक तयार करण्यात आले. मात्र ही पाठय़पुस्तक आणि विषय रचना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ानुसार नसल्याचा आक्षेप शिक्षण क्षेत्रातून घेण्यात येत आहे.

याबाबत शिक्षणशास्त्राचे अभ्यासक किशोर दरक यांनी सांगितले, ‘‘शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात शैक्षणिक बाबींचे अधिकार हे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे आहेत, तर पाठय़पुस्तकांचे अधिकार हे बालभारतीकडे आहेत. अशा वेळी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने वेगळा अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यासाठी मान्यता न घेता पुस्तके प्रकाशित करणे हा बालकांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. त्यासाठी समग्र शिक्षण अभियानाचा निधी वापराल जाणे हे अधिक चिंतेचे आहे. ज्या मंडळाचा अभ्यासक्रम केवळ त्याच्या निर्मात्यांच्या मनात, गोपनीय स्वरूपात आहे, त्या मंडळाची संलग्नता जिल्हा परिषदेच्या शाळांना आंतरराष्ट्रीय या बिरूदाखाली देऊन चालणारी फसवणूक थांबणे आवश्यक आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.’’

समग्र शिक्षण अभियानाच्या निधीचा वापर

समग्र शिक्षण अभियानांतर्गत शासकीय शाळांमध्ये मोफत पाठय़पुस्तके वाटण्यात येतात. राज्यमंडळाच्या शाळांमध्ये मोफत पाठय़पुस्तके वाटण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्येही समग्र शिक्षण अभियानाचा निधी वापरून मोफत पाठय़पुस्तके देण्यात आली आहेत.