गणोशोत्सवाच्या काळात २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीसांना स्वतःला गणेशोत्सव साजरा करता येत नाही. मात्र, यंदा सुरक्षेच्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ काढत पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातील गणपतींची वाजत-गाजत विसर्जन मिरवणूका काढल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपली मनसोक्त नाचण्याची हौसही भागवून घेतली.

पोलिसांचे हे नाचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यामध्ये पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत हलगी आणि मराठी गाण्यांवर ठेका धरताना दिसतात. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडूनही पोलिसांच्या कामगिरीसोबत त्यांच्या उत्सव साजऱ्या करण्याच्या भावनांचे कौतुक होत आहे.

 

गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवात पोलीस कर्मचारी, अधिकारी नागरिकांची सुरक्षा करीत आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी कब्बर कसली होती. विसर्जनाच्या दिवशी तर पोलिसांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत अनेक वेळा त्यांना आपल्या कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळे अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. अशा प्रकारे पोलीस कर्मचारी गणरायाची दहा दिवस विधिवत मनोभावे पूजन करतात. विसर्जनाच्या दिवशी इतर गणेश मंडळांच्या अगोदर पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. यंदाही हा कार्यक्रम राबवत मिळालेल्या थोड्याशा वेळेत मिरवणूक काढण्यात आल्या. यामध्ये ते बाप्पांना वाजत गाजत निरोप देताना स्वतःला झोकून देत गाण्यांवर आणि हलगी वादनावर ठेका धरताना दिसून आले.

सोशल मीडियात व्हायरल झालेले पोलिसांचे व्हिडिओ हे सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील असून यामध्ये बापाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलीस मनसोक्त नाचताना दिसत आहेत. यावेळी, सामान्य नागरिक पोलिसांचे कौतूक करीत असून वर्दीतील ही दर्दी माणसं असल्याच्या भावना ते व्यक्त करीत आहेत. कर्तव्य बजावत असताना त्यांनाही भाव-भावना आहेत आणि त्यामुळेच तेदेखील अशा प्रकारे उत्सव साजरा करीत आहेत हे विसरून चालणार नाही.