चित्रपटसृष्टीमध्ये पाश्र्वगायक म्हणून लोकप्रिय असलेले सुरेश वाडकर आणि ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायकीचे अंतरंग उलगडणार आहे. ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’तील ‘अंतरंग’ उपक्रमामध्ये या कलाकारांच्या मुलाखती होणार आहेत. तर, ‘षडज्’ उपक्रमामध्ये दोन लघुपट पाहण्याची संधी लाभणार आहे.
महोत्सवातील ‘अंतरंग’ आणि ‘षडज्’ उपक्रम ११ ते १३ डिसेंबर या कालावधीमध्ये सवाई गंधर्व स्मारक येथे होणार आहेत. ‘षडज्’ लघुपट महोत्सव सकाळी साडेदहा वाजता, तर अंतरंग कार्यक्रम सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. पहिल्या दिवशी (११ डिसेंबर) प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर निर्मित ‘एक सुरीला दरवेष – रजब अली खान’ हा लघुपट दाखविण्यात येणार असून त्यानंतर पं. अजय पोहनकर यांची मुलाखत होणार आहे. शुक्रवारी (१२ डिसेंबर) प्रसिद्ध संतूरवादक सतीश व्यास निर्मित ‘पं. सी. आर. व्यास- राग शुद्ध कल्याण’ हा लघुपट दाखविला जाणार असून उत्तरार्धात सुरेश वाडकर यांची मुलाखत होणार आहे. तर, शनिवारी (१३ डिसेंबर) ‘भीमसेनजींचे गायन’ हे दृक-श्राव्य सादरीकरण आणि त्यावरील विवेचन असा कार्यक्रम बकुल भावसार सादर करणार आहेत, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाकडे युवा पिढी आकर्षित व्हावी, या उद्देशाने यंदा प्रथमच टोपी, कॉफी मग, सवाई बॅग आणि टी-शर्ट या नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती केली आहे. महोत्सवाला उपस्थित राहणाऱ्या रसिकांसाठी रमणबाग प्रशालेमध्ये असलेल्या स्टॉलमध्ये ही उत्पादने उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती ‘इंडियन मॅजिक आय’ चे हृषीकेश देशपांडे यांनी दिली. महोत्सवातील दररोजचे सत्र संपल्यानंतर रसिकांना घरी परतण्यासाठी पीएमपीने बससेवा उपलब्ध करून दिली आहे. रमणबाग प्रशाला येथून कात्रज, धायरी, कोथरूड आणि कर्वेनगर येथे दररोज रात्री सव्वादहा वाजता या बसेस सुटणार आहेत.

‘विरासत’ छायाचित्र प्रदर्शन
प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन हे ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’तील महत्त्वाचे आकर्षण असते. यंदाच्या प्रदर्शनाची ‘विरासत’ ही संकल्पना असून नामवंत कलाकारांच्या छायाचित्रांसह त्यांच्या कुटुंबाचा सांगीतिक वारसा पुढे नेणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे. ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर आणि नातू (तबलावादक) निशिकांत बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी आणि श्रीनिवास जोशी, पं. कुमार गंधर्व आणि मुकुल शिवपुत्र व कलापिनी कोमकली, ज्येष्ठ सारंगीवादक पं. रामनारायण आणि सरोदवादक ब्रिजनारायण, ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि सत्यजित व सावनी तळवलकर यांसारख्या ११० छायाचित्रांचा समावेश असलेल्या ५५ फ्रेम्स या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत. गुरुंचे छायाचित्र सेफिया रंगामध्ये, तर भावी पिढीतील कलाकारांचे छायाचित्र ब्लॅक अॅन्ड व्हाईट असेल, अशी माहिती सतीश पाकणीकर यांनी दिली.