डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मास्टरमाईंड हा वीरेंद्र तावडे असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे. त्यानेच हत्येचा संपूर्ण कट रचला होता, असे सीबीआयने म्हटले आहे. डॉ. दाभोलकरांवर दोघांनी हल्ला केला होता. यातील सचिन अंदुरे याने गोळ्या झाडल्या होत्या. त्याला पोलिसांनी अटक केली असून २६ ऑगस्टपर्यंत त्याला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे याला प्रथम न्यायदंडाधिकारी ए. मुजुमदार यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी न्यायालयामध्ये सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी या हत्येवेळी संशयित आरोपीने कुठून पिस्तुल मिळवले, ते चालवण्यासाठी प्रशिक्षण कोठे घेतले. या तपासासाठी १४ दिवसांची सीबीआय कोठडीची मागणी केली.

बचाव पक्षाचे वकील प्रकाश सलसिंगीकर यांनी वीरेंद्र तावडेच्या चार्जशीटमध्ये सचिन अकोलकर आणि विनय पवार यांचा खुनाशी संबंध असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे सचिन आंदुरे विरोधात कोणताही पुरावा नसताना त्याला अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सलसिंगीकर यांचा दावा सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी खोडून काढला. तर यावेळी दाभोलकर हत्याप्रकरणी यापूर्वी अटकेत असलेला वीरेंद्र तावडे हा मास्टर माईंड असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला आहे.