काँग्रेसचा कोणताही उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेस भवनात जो जल्लोष आणि जी घोषणाबाजी दरवेळी होते, कार्यकर्त्यांचा जो उत्साह तेथे दिसतो तसा कोणताही प्रकार मंगळवारी विश्वजित कदम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस भवनात दिसला नाही. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतरही काँग्रेस भवनात शुकशुकाट होता आणि तेथे कार्यकर्तेही फिरकले नव्हते.
पुण्यातील उमेदवारीबाबत काँग्रेसमध्ये गेले अनेक दिवस खल सुरू होता. अखेर कदम यांच्या नावाची घोषणा मंगळवारी सायंकाळी झाली. मात्र, उमेदवार जाहीर झाल्यानंतरही पक्षाच्या कार्यालयात शुकशुकाट होता. खासदार सुरेश कलमाडी यांच्या काळात प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस भवनात उत्साही वातावरण दिसायचे. घोषणा देणारे, फटाके उडवणारे, खाखर वाटणारे, नेत्यांचा जयजयकार करणारे, झेंडे नाचवणारे कार्यकर्ते दिसायचे. कलमाडी यांचे आगमन झाल्यानंतर हा जल्लोष अधिकच वाढायचा. शेकडो कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी, हस्तांदोलनासाठी गर्दी करायचे. विधानसभांचे उमेदवार मुंबईतून जाहीर झाल्यानंतरही असाच जल्लोष काँग्रेस भवनात पाहायला मिळतो. या पाश्र्वभूमीवर काँग्रेस भवनातील शुकशुकाट मंगळवारी सायंकाळी विशेषत्वाने जाणवत होता.
मने जिंकण्याचा प्रयत्न करीन- कदम
काँग्रेसचा बालेकिल्ला ही पुण्याची पारंपरिक ओळख असून सर्वाच्या सहकार्याने पुणेकरांची मने जिंकण्याचा प्रयत्न करीन, असा विश्वास विश्वजित कदम यांनी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवड जाहीर झाल्यानंतर बीएमसीसी रस्त्यावर असलेल्या निवासस्थानी कदम यांचे रात्री आगमन झाले. तेथे फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. जातीयवादी शक्तींच्या प्रचाराला बळी न पडता पुणेकर सुज्ञपणे काँग्रेसबरोबरच राहतील. निवडणूक हे आव्हान असले, तरी सर्वाना बरोबर घेऊन काम करीन, असेही ते म्हणाले.