गुरु गोविंदसिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीवर्षांचे औचित्य साधून सरहद संस्थेतर्फे पुण्यामध्ये विश्व पंजाबी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या संमेलनासाठी जगभरातील पंजाबी साहित्यिकांना आणि मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
घुमान येथे झालेल्या ८८ व्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशा प्रकारचे पंजाबी भाषेचे संमेलन महाराष्ट्रात घेण्याची सूचना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली होती. त्याला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन दिले होते. हे संमेलन नागपूर किंवा नांदेड येथे घ्यावे असा प्रस्ताव होता. मात्र, गुरु गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त हे संमेलन पुण्यातच घ्यावे, असा प्रस्ताव सरहद संस्थेने ठेवला. त्यावर चर्चा होऊन हे संमेलन पुण्यात घेण्यासाठी या तीनही नेत्यांसह पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी मान्यता दिली असल्याची माहिती सरहद संस्थेचे संजय नहार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. माजी महापौर मोहनसिंग राजपाल, भारत देसडला आणि संतसिंग मोखा या वेळी उपस्थित होते.