हिरव्या बोलीचे निसर्गकवी ना. धों. महानोर हेच दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असावेत हीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची इच्छा असल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शुक्रवारी सांगितले. मात्र, दोन संमेलनांमध्ये बराच कालखंड गेल्यामुळे महानोर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती करण्यात येणार आहे. त्यानंतरच ही बाब स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
तीन वर्षांपासून रखडलेले विश्व साहित्य संमेलन पुढील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणार आहे. साऊथ आफ्रिकन मराठी मंडळ आणि उत्कर्ष प्रोजेक्ट्स यांनी संयुक्तपणे दिलेले निमंत्रण महामंडळाने स्वीकारले असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी नुकतेच जाहीर केले. अमेरिकेतील सॅन होजे येथे पहिले विश्व साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर दुबई आणि सिंगापूर येथे ही संमेलने झाली. दोन वर्षांपूर्वी कॅनडातील टोरांटो येथे निश्चित झालेले विश्व साहित्य संमेलन संयोजकांच्या निधी संकलनाअभावी रद्द करण्यात आले होते. आता दक्षिण आफ्रिकेतील निमंत्रण साहित्य महामंडळाने स्वीकारले आहे.
टोरांटो येथे होणाऱ्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची निवड करण्यात आली होती. मात्र, हे संमेलन होऊ न शकल्याने आता अध्यक्षपदी तेच असावेत हीच आमची इच्छा आहे. मात्र, दोन वर्षांचा कालखंड गेल्यामुळे आम्ही महामंडळाचे प्रतिनिधी लवकरच त्यांची भेट घेऊन अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती महानोर यांना करणार आहोत. त्याचप्रमाणे जोहान्सबर्ग येथील संमेलनाची घोषणा करण्यापूर्वी महानोर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली होती, असेही डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.
अनुदान मिळण्यात अडचण नाही
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्तीला धर्मादाय आयुक्तांनी अद्याप मंजुरी दिलेली नसली तरी त्याचा संमेलनाला राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर कोणताही परिणाम होईल, असे वाटत नाही, असेही डॉ. माधवी वैद्य यांनी स्पष्ट केले. महामंडळाच्या बैठकीमध्ये घटना दुरुस्तीला मंजुरी मिळाल्यानंतर ती घटना लागू होते. धर्मादाय आयुक्तांची मान्यता ही केवळ औपचारिक बाब आहे. सिंगापूर येथील संमेलनाला राज्य सरकारने ५० लाख रुपयांचे अनुदान दिले होते. त्यापैकी शिल्लक राहिलेला १९ लाख रुपयांचा निधी सरकारला परत करण्यात आला आहे. तर, टोरांटो येथील संमेलन रद्द झाल्यानंतर अनुदानाची २५ लाख रुपयांची रक्कम सरकारकडे जमा केली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचे हे अनुदान साहित्य महामंडळाला नव्हे तर, संयोजक संस्थेला मिळते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विश्व साहित्य संमेलनाला राज्य सरकाकडून अनुदान मिळण्यात अडचण येईल, असे वाटत नाही, असेही वैद्य यांनी सांगितले.

marathi sahitya sammelan, Delhi,
यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….
India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत