News Flash

शेषरावांसाठीच संमेलनाला आलो- भालचंद्र पटवर्धन

शेषरावांचे भाषण ऐकण्यासाठी आलो आहे, अशी भावना साहित्याचे अनुवादक भालचंद्र पटवर्धन यांनी व्यक्त केली.

प्रा. शेषराव मोरे यांचा आणि माझा गेल्या पंधरा वर्षांपासूनचा स्नेहबंध आहे. त्याच भूमिकेतून मी अंदमानला खास शेषरावांचे अध्यक्षीय भाषण ऐकण्यासाठी आलो आहे, अशी भावना शेषरावांच्या साहित्याचे अनुवादक भालचंद्र पटवर्धन यांनी व्यक्त केली.
इस्लामचे चार खलिफा, सावरकरांचा बुद्धिवाद आणि गांधीजी व काँग्रेसने अखंड भारत का नाकारला. या शेषरावांच्या तीन पुस्तकांचा पटवर्धन यांनी स्वतंत्ररीत्या इंग्रजी अनुवाद केला आहे. तर ‘मुस्लीम मनाचा शोध’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी त्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. स. ह. देशपांडे आणि चेन्नई येथील अशोक जोशी यांना सहकार्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वंदन करण्यासह शेषरावांच्या अध्यक्षीय भाषणाची पर्वणी लुटायची आहे. त्यासाठीच पत्नी आणि भगिनीसमवेत अंदमानला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यातील राजकारणापासून दूर असलेल्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाला चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याचा आनंदही पटवर्धन यांनी व्यक्त केला.
माझे मित्र डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्यामुळे माझा शेषरावांशी परिचय झाला. गेल्या पंधरा वर्षांत या परिचयाचे एका अनोख्या ऋणानुबंधनात रूपांतर झाले आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. भारताच्या इतिहासासंदर्भात मुस्लिमांचा अभ्यास करणारे शेषराव मोरे हे सध्याच्या काळातील एकमेव अभ्यासक आहेत, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
पटवर्धन हे मूळचे सांगली जिल्ह्य़ातील कुरुंदवाड येथील पटवर्धन राजघराण्याचे वारसदार आहेत. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) त्यांनी अभियांत्रिकी पदवी संपादन केली. मात्र, ते वास्तव्याला पुण्यात असले, तरी अजूनही ते कुरुंदवाडला जाऊन शेतीही करतात. शेती हाच व्यवसाय असल्याचे आवर्जून सांगतात.
उद्धव ठाकरे यांचे आगमन
विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्वागताध्यक्ष खासदार राहुल शेवाळे गुरुवारी सकाळी अंदमानात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या सेल्युलर जेलला भेट दिली. सायंकाळी त्यांनी पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन तेथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राबाहेरील प्रांतात मराठीचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र मंडळ करत असलेल्या कार्याची त्यांनी प्रसंशा केली. दरम्यान, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह महामंडळाचे काही सदस्यही अंदमानला पोहोचले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 2:22 am

Web Title: vishwa sahitya sammelan port blear andman
Next Stories
1 चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांचा दिवसाढवळ्या खून
2 चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची हत्या
3 पुण्यात एक वेळ पाणीपुरवठा
Just Now!
X