जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने विश्वमाता फाउंडेशनतर्फे प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना वाढवणाऱ्या निवडक ५१ मातांचा गौरव करण्यात येणार आहे. संस्थेचे संस्थापक शिवाजी घाडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे या मातांचा सत्कार केला जाईल. ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी सोलापूरमधील डोंबाळवाडी येथील कावेरी अण्णा घाडगे यांना मरणोत्तर ‘राष्ट्रीय विश्वमाता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
संस्थेतर्फे वडिलांविषयीच्या १२१२ कवितांचा ‘प्रिय बाबा’ हा काव्यखंड प्रकाशित केला जाणार असल्याचे शिवाजी घाडगे यांनी सांगितले. २० जून रोजी जागतिक पितृदिनाच्या निमित्ताने ज्या वडिलांनी स्वत: आई होऊन अपत्यांचे संगोपन केले, अशा ५१ पित्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्तींनी या सन्मानासाठी आपल्या वडिलांची सविस्तर माहिती छायाचित्रासह संस्थेकडे ३१ मेपर्यंत पाठवावी, असे आवाहन देखील त्यांनी केले. संपर्कासाठी क्रमांक- ९८२२७५३९६९, ९७६६२९१०७५