मराठा चेंबर, ‘पीपीसीआर’चा पुढाकार

पुणे : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए)  ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स’तर्फे (पीपीसीआर) ‘मिशन वायू’ अंतर्गत वैद्यकीय सज्जतेसाठी पहिल्या टप्प्यातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि बायपॅप मशिन्स राज्य प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि ५० बायपॅप मशिन्स सुपूर्द करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, एमसीसीआयएचे माजी अध्यक्ष व केपीआयटी समूहाचे अध्यक्ष रवि पंडित, बजाज ग्रुपच्या सीएसआर विभाग प्रमुख पंकजा वल्लभ, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते.

राव म्हणाले,की गेल्या १४ महिन्यांपासून पुण्यासह राज्यातील वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी एमसीसीआयए आणि पीपीसीआरने दिलेले योगदान मोलाचे आहे. या उपक्रमाअंतर्गत तातडीने आयात केल्या गेलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि बायपॅपमुळे आपल्या वैद्यकीय सज्जतेत मोठी वाढ झाली आहे. गिरबने म्हणाले,की करोना संकटावर मात करण्यासाठी सरकार, उद्योगजगत, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि समाज एकत्र आल्याचे सुखद चित्र निर्माण झाले आहे. पीपीसीआरसाठी पुण्यासह, राज्य आणि देशाबरोबरच परदेशातूनही नागरिकांनी, उद्योगांनी हातभार लावला आहे.

काय आहे ‘मिशन वायू’

राज्यासह देशभरातील व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर’च्या  (एमसीसीआयए) ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड-१९ रिस्पॉन्स’ (पीपीसीआर) व्यासपीठाने ‘मिशन वायू’ उपक्रम हाती घेतला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात २५० व्हेंटिलेटर आणि ४ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स करोनाबाधित भागांमध्ये देणगी स्वरूपात दिले जाणार आहेत. या उपक्रमासाठी आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठीची माहिती एमसीसीआयएच्या संकेतस्थळावर तसेच समाज माध्यमांवर उपलब्ध आहे.