आपल्या सौरमालेतील एका लघुग्रहाला बुद्धिबळपटू व माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचे नाव देण्यात आले असून त्या ग्रहाचे नामकरण ‘विशीआनंद’ असे करण्यात आले आहे, अशी माहिती ‘चेसबेस’ या संकेतस्थळाने दिली आहे.
 सध्या आपल्या सूर्यमालेत प्लुटोचे ग्रहपद गेल्यामुळे आठच ग्रह असले तरी इतर साडेसहालाख लघुग्रह आहेत, तसेच ३८०० धूमकेतू आहेत. साधारण पाच ते दहा मिनिटाला एक ग्रह शोधला जातो, तर आठवडय़ाला एक नवीन धूमकेतू शोधला जातो. कक्षा अचूक शोधल्यावर ग्रहाला अंक दिला जातो  व नंतर नाव सुचवले जाते. पहिला लघुग्रह ‘सेरेस १’ हा १८०१ मध्ये शोधण्यात आला होता. ग्रहांना नाव देताना सूचना मागवल्या जातात व त्यावर इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियन अंतिम निर्णय घेत असते. ४५३८ क्रमांकाच्या लघुग्रहाला नाव देण्यास सुचवण्यात आले होते. हा ग्रह १९८८ मध्ये शोधला होता. या ग्रहाला नाव देण्यासाठी ‘इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियन’ या संस्थेचे सदस्य मायकेल रूडेन्को यांना बोलावण्यात आले होते, त्यांनी या ग्रहाला विश्वनाथन आनंद याचे नाव देण्याची सूचना केली व ती इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने मान्य केली. बुद्धिबळ हा आपला आवडता खेळ असल्याने आपण हे नाव सुचवल्याचे रूडेन्को यांनी सांगितले. त्यामुळे हा ग्रह आता ‘विशीआनंद’ या नावाने ओळखला जाईल. यापूर्वी एका ग्रहाला कवी कुसुमाग्रजांचेही नाव देण्यात आले होते.