मंगलमय स्वरांनी सजलेले शहनाईवादन आणि ‘देवगंधर्व’ गायकीची अनुभूती देणारे सहगायन अशा युवा कलाकारांच्या बहारदार मैफलींनी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास गुरुवारी रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला. स्वर, लय आणि तालाचा आनंद घेत ‘ताने स्वर रंगवावा’ या समर्थाच्या उक्तीची प्रचिती रसिकांना आली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची पारंपरिक उत्साहामध्ये गुरुवारी सुरुवात झाली. सनईवादनाची पाच पिढय़ांची परंपरा असलेल्या गायकवाड घराण्यातील नम्रता गायकवाड हिच्या शहनाईवादनाने रंग भरला. महोत्सवातील पहिले सत्र दुपारी तीन वाजता सुरू होणार असले, तरी उन्हाची तमा न बाळगता दोन वाजल्यापासूनच रसिक न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानाकडे जाण्यास निघाले. भव्य मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वरमंचावरून सादर होणारा कलाविष्कार आणि कलाकारांच्या भावमुद्रा सुस्पष्टपणे पाहायला मिळाव्यात यासाठी अनेकांनी मोक्याच्या जागा काबीज केल्या होत्या.
नम्रता गायकवाड हिच्या शहनाईवादनाला तिची आई आणि गुरू सीमा गायकवाड यांची सूरशहनाईची साथ लाभली. नम्रताला एवढी मोठी संधी मिळाली आणि तिने रसिकांना जिंकले याचा आनंद शब्दांत वर्णन करता येणारच नाही, अशी भावना नम्रता गायकवाड हिची आई आणि गुरू सीमा गायकवाड यांनी व्यक्त केली. नम्रता शहनाईवादन करीत आहे आणि मी तिला साथ करतेय, ही गोष्ट माझ्यासाठी आई म्हणून आनंद देणारी आहे तशी गुरू म्हणून अभिमानाची बाब आहे. आमचे स्वप्न साकार झाले. नम्रताने अशीच प्रगती करावी आणि संगीत क्षेत्रातील गुरुजनांसह रसिकांचेही तिला आशीर्वाद लाभावेत, अशी इच्छा सीमा गायकवाड यांनी प्रदर्शित केली.
देवगंधर्व भास्करबुवा बखले यांच्या पणती शिल्पा दातार-पुणतांबेकर आणि सावनी दातार-कुलकर्णी या भगिनींचे सहगायन झाले. समर्थ रामदास यांचा ‘ताने स्वर रंगवावा’ हा अभंग सादर करून त्यांनी श्रोत्यांनाजिंकले. हा अभंग स्वरबद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके या मैफलीस आवर्जून उपस्थित होते. माउली टाकळकर यांचे टाळवादन, संदीप कुलकर्णी यांचे बासरीवादन आणि राजेंद्र दूरकर यांच्या पखवाजवादनाने या अभंगामध्ये रंग भरला. भास्करबुवांनी संगीत दिलेल्या ‘संगीत स्वयंवर’ नाटकाच्या शताब्दीचे औचित्य साधून शिल्पा आणि सावनी यांनी मूळ बंदिशीसह ‘एकला नयनाला’ हे पद सादर केले. किराणा घराण्याचे गायक पं. विश्वनाथ यांच्या गायनानंतर रूपक कुलकर्णी आणि प्रवीण शेवलीकर यांची बासरी आणि व्हायोलिनवादनाची जुगलबंदी झाली. बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनाने पहिल्या सत्राची सांगता झाली.
रसिकांच्या मनगटावर ‘बँड’
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यंदा प्रथमच प्रशालेच्या मैदानावर प्रवेश करताना आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्यकर्ते रसिकांच्या हातावर ‘रिस्ट बँड’ लावत होते. काही रसिक बाहेर जाऊन संगीताचा आनंद लुटण्यासाठी परत मंडपामध्ये येतात. या गडबडीत काहींचा ‘गेट पास’ हरविण्याची शक्यता असते. हे ध्यानात घेऊन यंदा रिस्ट बँड लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे ज्यांच्या मनगटावर हा बँड आहे त्यांना लगेचच प्रवेश मिळाला आणि रसिकांची सोय झाली.

महोत्सवात आज (दुपारी ३.३० वाजता)
– शुचिस्मिता दास (गायन)
– उस्ताद अमजद अली (गायन)
– नीलाद्री कुमार (सतार)
– पं. जसराज (गायन)