‘समाजातील दुर्लक्षितांच्या जीवनाला दिशा देणे हे खरे कार्यकर्त्यांचे काम आहे. चांगली कामे करणाऱ्या खंबीर कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे,’ असे मत सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले.
कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान समारंभावेळी पाटील बोलत होते. प्रेरणा आणि परिवर्तन संस्थेचे प्रमुख डॉ. प्रवीण आणि प्रीती पाटकर यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पंचवीस हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते रवी घाटे, अभिनेते भालचंद्र कदम यांचाही स्मृतिचिन्ह, अकरा हजार रुपये, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मोहन जोशी, गिरीश बापट, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी आमदार उल्हास पवार, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, धनंजय थोरात यांच्या मातोश्री रमाबाई थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, ‘‘सामाजिक बंधने ही फक्त नैतिकतेच्या गप्पा मारून झुगारून देता येत नाहीत. त्यासाठी कृतिशील होण्याची गरज असते. समाजातील उपेक्षित, दुर्लक्षितांच्या आयुष्याला दिशा देणे, त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे.’’
यावेळी सुधीर गाडगीळ यांनी रवी घाटे आणि भालचंद्र कदम यांच्याशी संवाद साधला.