‘मुलगा घरात नाही त्याची स्लिप माझ्याजवळ नका देऊ’ घरातील ज्येष्ठाकडून होणारी विनंती .. मतदाराची सही अनिवार्य केल्यामुळे एकाच घरामध्ये स्लिपवाटपासाठी वारंवार घालाव्या लागणाऱ्या खेपा.. पुरवणी यादीमध्ये नाव समाविष्ट झालेल्या मतदारांसाठी पुन्हा वेगळी खेप.. वाटपासाठी हातामध्ये केवळ एकच आठवडय़ाचा कालावधी.. या समस्यांना सामोरे जात फोटो व्होटर स्लिपवाटप करण्याचे काम करताना शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (१५ ऑक्टोबर) मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र हा पुरावा म्हणून अनिवार्य केले आहे. त्याखेरीज निवडणूक आयोगातर्फे मतदारांना फोटो व्होटर स्लिप देण्यात येत असून मतदान करताना ही स्लिप सोबत असेल तर अन्य कोणतेही ओळखपत्र नसले तरी त्याला मतदान करता येणार आहे. त्यामुळे या फोटो व्होटर स्लिपला महत्त्व प्राप्त झाले आहे. या स्लिपा केवळ तीन दिवसांपूर्वी मिळाल्या असून एका आठवडय़ात या स्लिपांचे वाटप हे खडतर शिवधनुष्य शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना पेलायचे आहे. मात्र, यामध्ये असंख्य अडचणी येत असून आमच्या तक्रारी कोणासमोर मांडायच्या अशी व्यथा हे काम करणाऱ्या लोकांची आहे. या कामामध्ये येणाऱ्या समस्या त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या बोलीवर सांगितल्या.
मतदारांना स्लिपा वाटण्याचे काम पूर्वी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करायचे. हे काम आता निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे. मात्र, निवडणूक आयोगाची त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे सहामाही परीक्षेच्या गडबडीत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविली जाते. कमी वेळात एक हजार मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना या स्लिपा पोहोचविणे अशक्य आहे. ही स्लिप हाती देताना संबंधित मतदाराची स्वाक्षरी घेणे अनिवार्य केले आहे. एकाच सोसायटीमध्ये नव्हे तर, एकाच घरामध्ये किमान तीन-चार वेळा जावे लागते. कधी घराला कुलूप असते, एका घरामध्ये तर ज्येष्ठ नागरिकाने स्वत:ची फोटो व्होटर स्लिप घेतली. मात्र, ‘मुलगा घरात नाही. त्यामुळे त्याची स्लिप ही तुम्ही त्याच्याजवळच द्या’, असे सांगितले. एखाद्या मतदाराचे नाव पुरवणी यादीमध्ये असेल तर, त्याची स्लिप देण्यासाठी पुन्हा जावे लागते, अशा अडचणी त्रस्त शिक्षकाने मांडल्या.
अडचणी नेमक्या कोणत्या?
– आम्हाला दिलेल्या यादीमध्ये घरातील चार मतदारांची नावे एकाखाली नसतात. त्यावर उपाय म्हणून आम्ही एकाच आडनावाच्या स्लिपा एकत्र करून घेतो. जेणेकरून एखाद्या घरामध्ये गेल्यावर वाटप करणे सोईचे जाते.
– आम्हाला घरामध्येदेखील घेतले जात नाही. पाणी हवे का हेदेखील विचारले जात नाही. दारामध्येच उभे राहून ही कामे केली जातात. कित्येकदा जाळीच्या दारातूनच स्लिपा घेतल्या जातात.
– मेहनत करून आम्ही वाटप केलेल्या स्लिपा मतदार मतदान करताना घेऊन येतच नाहीत. त्यामुळे मतदान केंद्रावर नागरिक आल्यानंतर त्यांना कोऱ्या कागदावर मतदार यादीतील नाव आणि अनुक्रमांक लिहून चिठ्ठी द्यावीच लागते.