भाजप विरोधी मतांच्या विभाजनाचा उत्तर प्रदेशात भाजपला फायदा झाला. आता भाजपने या प्रदेशात विकासकामे करून तेथून तरुणांचे रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतरण थांबवावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशात भाजपविरुद्ध समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचा लोकदल स्वतंत्र लढले. सहाजिकच, भाजप विरोधी मतांचे विभाजन झाले. भाजप आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित केले होते. पंतप्रधानांनी एका राज्यात पक्षाची सत्ता आणावी म्हणून केलेले प्रयत्न प्रथमच पाहायला मिळाले.

उत्तर प्रदेशातील बहुरंगी लढतीचे चित्र पाहिल्यावर असाच निकाल अपेक्षित होता. आता तेथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विकासाकडे लक्ष केंद्रित करावे, अशी तेथील जनतेची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि इतर महानगरात उत्तर भारतीयांचे होत असलेले स्थलांतर रोखण्यासाठी तेथे रोजगारनिर्मिती करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.

पंजाबमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अकाली दल आणि भाजप युतीची सत्ता होती. लोकांनी यावेळी या युतीला नाकारून काँग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे. पंजाब सीमेवरचे राज्य आहे. देशात अन्नधान्य पुरवठय़ाच्या बाबतीत हे राज्य नेहमीच महत्त्वाची कामगिरी करीत आले आहे. पंजाबी लोकांचा विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी आता तेथील नवीन काँग्रेस सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. गोवा आणि मणिपूरमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी काँग्रेस सर्वाधिक जागा घेणारा पक्ष म्हणून पुढे आला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर तेथे तळ ठोकून बसले होते. इतर केंद्रीय मंत्र्यांनीही तेथे प्रचाराचा धडाका लावला होता. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसची गोव्यातील कामगिरी सरस ठरते. मणिपूरमध्ये भाजप अजिबात नसतानाही तेथे पक्षाला मिळालेले यश अवर्णनीय आहे, असे पवार म्हणाले.