आठवडय़ाच्या विलंबानंतर अंतिम आकडेवारी जाहीर

महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन आठवडा झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मतदानाची अंतिम आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडील आकडेवारीनुसार ७३ मतांचा फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक अठरा, सत्तावीस आणि चाळीस या तीन प्रभागांतील मतदानाच्या आकडेवारीत ही तफावत आहे. दरम्यान, मतदानाशी थेट संबंध असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या अहवालात हा फरक दिसून आला असून यामध्ये कोणत्याही प्रकाराची चूक नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकवीस फेब्रुवारी रोजी मतदान झाले. तर तेवीस फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट झाल्यानंतर मतदान यंत्रात घोटाळा झाल्याचा, मतदान यंत्रातील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप सुरू झाला होता. त्यातच महापालिका प्रशासनाकडूनही मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र गुरुवारी निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी त्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीसाठी प्रत्यक्षात झालेले मतदान आणि झालेली मतमोजणी यामध्ये तीन प्रभागात मिळून ७३ मतांचा फरक असल्याचे त्यांनी सांगितले.

खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ या प्रभाग क्रमांक अठरामध्ये ८६ बूथवर ३८ हजार ५०२ मतदान झाले. त्यामध्ये ४० मते ही पोस्टल स्वरूपाची होती. नोटा हा पर्याय वगळता अ, ब आणि क जागेसाठीचे हे ८६ हजार ५०२ मतदान होते. तर ड गटासाठीची मतदानाची आकडेवारी ३८ हजार ४४० अशी होती. बूथ क्रमांक ६२ मध्ये ड गटासाठी ६२ मतांचा फरक आढळून आला. कोंढवा खुर्द-मीठानगर या प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये साठ बूथवर २४ हजार ४१४ एवढे मतदान झाले.

यामध्ये अ गटातील जागेसाठी २४ हजार ४०९, ब गटासाठी २४ हजार ४१३, क जागेसाठी २४ हजार ४१० तर ड साठी २४ हजार ४०७ असा मतदानाचा आकडा राहिला. यामध्ये प्रत्येक जागेसाठीच्या मतदानाचा फरक असून सर्वाधिक फरक सात असा असून तो ड गटासाठी आहे. तर कात्रज-आंबेगाव या प्रभाग क्रमांक चाळीसमध्ये ३६ हजार ६९८ मतदान झाले. येथील प्रत्येक जागेसाठीही वेगवेगळे मतदान झाल्याची नोंद आहे. अ साठी ३६ हजार ६८५, ब जागेसाठी ३६ हजार ६८८, क जागेसाठी ३६ हजार ६८५ तर ड गटासाठी ३६ हजार ६८९ असे मतदान नोंदविले गेले. येथेही चार मतांचा फरक असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

चूक नाही, फक्त फरक

निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी दिलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात झालेली मतमोजणी केलेल्या अधिकाऱ्यांच्या अहवालातून हा  फरक असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यामध्ये काही गोंधळ किंवा चूक झाली आहे, असे म्हणता येणार नाही. मतमोजणीच्या वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेण्यात आला नव्हता. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदान करण्यासाठी दोन ते तीन मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला होता. दोन प्रभाग वगळता एका मतदाराला चार मते देणे बंधनकारक होते. उमेदवारांना मतदान करायचे नसल्यास नोटाचा पर्याही होता. मात्र मतदान यंत्राच्या वापरात चारही गटातील प्रत्येकी एक बटण दाबल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही, असे असतानाही ७३ मतांचा फरक कसा निर्माण झाला, याबाबत मात्र अद्यापही संदिग्धता आहे.

मतदानाच्या आकडेवारीतील फरकाबाबत शक्यता वर्तविण्यास सुरुवात झाली आहे. मतदारांच्या दोन किंवा तीन ठिकाणी मतदानानंतर मशिनवरील ‘एण्ड’ हे बटण दाबण्यात आल्यामुळे काही मतांची नोंद झाली नसावी, अशी शक्यताही अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.