मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते आणि राजकीय पक्ष कार्यरत असतातच, पण या कामासाठी आता प्रशासनही सज्ज झाले आहे.. गेल्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदानाची टक्केवारी खूपच कमी आहे. ही टक्केवारी ७५ टक्क्यांवर नेणे निवडणूक आयोगाला अपेक्षित आहे. त्यादृष्टीने पुणे जिल्हय़ातील चारही मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, अशा सूचना मावळ, बारामती आणि शिरूर मतदारसंघासाठी असणाऱ्या निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समन्वय अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. मावळ मतदारसंघाचे निरीक्षक आशिष कुमार, बारामती मतदारसंघाचे निरीक्षक विनय कुमार आणि शिरूर मतदारसंघाचे निरीक्षक टी. एन. वेंकटेश यांनी या सूचना दिल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त श्याम देशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष धर्माधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपूर्वा वानखेडे आणि समन्वय अधिकारी उपस्थित होते.
पुण्यामध्ये युवक वर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. मतदार जागृतीचे कार्यक्रम आखून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. विविध शिक्षण संस्थांतून मतदान करण्याबाबतच्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्यामुळे युवक वर्गात मतदान करण्याबाबत जागृती निर्माण होईल. गेल्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या केंद्रांच्या परिसरात मतदानाबाबत जनजागृती करावी. भरारी पथकाद्वारे केली जाणारी तपासणी व्यापक आणि काटेकोरपणे होणे अपेक्षित आहे. प्रचारासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध परवानगीसाठी एक खिडकी कक्ष सुरू करावेत. या कक्षात पुरेसे कर्मचारी असतील आणि कक्षात योग्य यंत्रणा उपलब्ध असेल याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
निरीक्षकांनी श्ॉडो रजिस्टर खर्चाच्या नोदी, टपाली मतदानाची व्यवस्था, मतदानासाठीचे आवश्यक आणि राखीव मनुष्यबळ याबाबतची तयारी वेळेत करून घ्यावी. कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून मतदानाच्या दिवशी प्रशिक्षण देताना तुकडी कमीतकमी कर्मचाऱ्यांची असावी, असेही निरीक्षकांनी सांगितले.