मावळ तालुक्यातील गड किल्ल्यांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान आणि बजरंग दल यांच्या वतीने ठोक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थात विसापूर, लोहगड या किल्ल्यांवर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यकांना चोप देण्यात येत आहे. तसेच अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांनाही फटके देण्यात येत आहेत. लोणावळा पोलिसांना जेव्हा हे सगळे कळले होते तेव्हा त्यांनी सह्याद्री प्रतिष्ठान आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बोलावले आणि चर्चा करुन कायदा हातात घेऊ नये असे म्हटले होते. मात्र दीड तास झालेल्या चर्चेनंतर आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या घटना लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी ठोक मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

गड किल्ल्यांवर होणारे अश्ली चाळे आणि दारु पिऊन धिंगाणा घालण्याचे  गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीसही आता बजरंग दल आणि सह्याद्री प्रतिष्ठानला सहकार्य करणार आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक लुकडे आणि त्यांचे सहकारी रविवारी लोहगड आणि विसापूर किल्ल्यावर हजर असणार आहेत. शनिवार आणि रविवार म्हटला की पावसाळ्यात ट्रेकर्सच्या उत्साहाला उधाण येतं. पावसाळ्यात लोहगड, विसापूर आणि लोणावळा भागात असलेले किल्ले आणि गड सर करणं अनेकांना आवडतं. मात्र प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे आणि दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या काही जणांमुळे या सगळ्या उत्साहावर, आनंदावर विरजण पडतं हे सगळे प्रकार टाळण्यासाठीच ठोक मोहिम हाती घेण्यात आली आहे. गड किल्ल्यांवरचे तळीराम आणि प्रेमी युगुलांना सह्याद्री प्रतिष्ठान आणि बजरंग दल फटके देणार आहे. या ठोक मोहिमेला पोलिसांनीही पाठिंबा दर्शवला आहे.