मुंबईसह कोकणात गेल्या तीन-चार दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाच्या सरी शुक्रवारी आता राज्याच्या अंतर्गत भागातही पोहोचल्या आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडला. या पावसाचा जोर वाढणार असून, पुढील चार दिवस पावसाचे असतील, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
पावसाने कोकणाचा काही भाग वगळता इतरत्र गेला दीड महिना दडी मारली होती. आता मात्र त्याचे चांगले आगमन होण्यास अनुकूल स्थिती आहे. त्याचा प्रत्ययही शुक्रवारी आला. मुंबईत सांताक्रुझ येथे सायंकाळपर्यंत ६० मिलिमीटर पाऊस पडला. याशिवाय कोकणात अलिबाग (४९ मिलिमीटर), रत्नागिरी (३९), डहाणू (१८), भीरा (५१) येथे संततधार पाऊस पडला. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली. पुणे (४), कोल्हापूर (४), सातारा (५), सांगली (०.२) येथेही पाऊस झाला. धरणांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावरही पावसाने चांगली हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभरात महाबळेश्वर  येथे ५६ मिलिमीटर पाऊस झाला. याशिवाय गगनबावडा (९३), कोयना (५९), रतनवाडी (नगर) (४८), ताम्हिणी येथेही दमदार पाऊस पडला. विदर्भातही गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ येथे पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मात्र विशेष पाऊस पडला नाही.
याबाबत पुणे वेधशाळेतील अधिकारी डॉ. पीसीएस राव यांनी सांगितले की, पुढील तीन-चार दिवस पावसाचे असतील. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची तीव्रता पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातसुद्धा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. दक्षिण भारतातही चांगला पाऊस पडेल. त्याचबरोबर मान्सून देशाचा उरलेला भागसुद्धा व्यापेल.