नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली, पण तिने काही दिवसांतच काढता पाय घेतला. समुद्रातील घडामोडींमुळे थंडी फार काळ टिकली नाही. आता समुद्रातून दक्षिण भारताच्या दिशेने चक्रीवादळांची मालिकाच सुरू झाली आहे. परिणामी महाराष्ट्रातही काही भागांत पावसाची शक्यता निर्माण झाल्याने या आठवडय़ात तरी तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीसाठी डिसेंबरचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ामध्ये राज्याला थंडीची चाहूल लागली होती. सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाडय़ात तापमानाचा पारा घसरला. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि दुसऱ्या आठवडय़ाच्या शेवटी कोकण विभागातही रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा खाली आले होते. अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी पारा घसरल्याने हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मात्र, दिवाळीपूर्वी तापमानात एकदमच बदल झाला. सुरुवातीला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन आंध्र प्रदेश, तेलंगणासह राज्यात बाष्पाचा पुरवठा झाला. त्यामुळे काही भागांत पाऊस झाला. त्यामुळे तापमानात लक्षणीयरीत्या वाढ झाली.

पूर्वेबरोबरच दक्षिण अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तापमानवाढीत भर पडली. दररोज नीचांकी तापमान नोंदविल्या जाणाऱ्या मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांनी वाढला.

सुरुवातीला समुद्रात गती चक्रीवादळ निर्माण झाले. त्याचा प्रभाव लगेचच कमी झाला असला, तरी पुन्हा बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रीवादळ तयार होते आहे. त्याचा सर्वाधिक फटका तमिळनाडूला बसणार असून, तेथे अति मुसळधार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होणार आहे.

थंडीला नेमके काय झाले?

उत्तरेकडील राज्यांत तापमानाचा पारा घसरून कडाक्याची थंडी पडल्यानंतर तेथून येणारे थंड वारे आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीत महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरतो. नोव्हेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत ही प्रक्रिया घडली. त्यामुळे थंडीची चाहूल लागली. मात्र, त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही वेगवेगळ्या वेळेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाली. त्यामुळे समुद्रावरून बाष्पयुक्त वारे वाहिल्याने राज्यात ढगाळ स्थिती निर्माण झाली. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला. परिणामी राज्याच्या तापमानात वाढ होत जाऊन थंडी गायब झाली.

राज्यात पाऊस कुठे?

बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. २४ नोव्हेंबपर्यंत बहुतांश भागात कोरडे हवामान राहणार आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. २६ नोव्हेंबरला मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल. २७ नोव्हेंबरलाही या दोन्ही विभागांत पावसाचा इशारा असून, २६, २७ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.