दिवसाढवळ्या दरोडा, मुख्य आरोपी मोकाटच, गल्लीबोळात पोहोचला गांजा

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले, त्याचा अपेक्षित उपयोग झालेला नाही, हे अनेक घटनांमधून दिसून आले आहे. रहाटणीत दिवसाढवळ्या सराफ पेढीवर दरोडा टाकणारा मुख्य सूत्रधार पोलिसांना अजून सापडलेला नाही. शहरात मोठय़ा प्रमाणात गांजाची विक्री सुरू आहे.  इतर गुन्ह्य़ांचे सत्र काल होते, तसेच आजही आहे. निवडणुका आठवडय़ावर आल्या असताना, पोलीस दल सुस्त असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

६ मार्च २०१९.. दुपारी पावनेएकची वेळ. रहाटणी शिवराजनगर येथील पुणेकर ज्वेलर्समध्ये पाच अनोळखी इसम घातक शस्त्रांसह बळजबरीने प्रवेश करतात आणि पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार करून तीन किलो सोन्यासह सुमारे ९० लाखांचा ऐवज घेऊन पोबारा करतात. एखाद्या चित्रपटात शोभेल, अशी ही घटना. आरोपींनी जाताना सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर चोरून नेल्याने तपास कामात पेच निर्माण झाला होता. दिवसाढवळ्या सराफाच्या पेढीवर दरोडा टाकण्याचे प्रकरण तसे गंभीर होते. याबाबतची माहिती वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा अंदाज घेत तपासासाठी चार वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली. पोलीस कसून तपास करत होते. मात्र, यश मिळत नव्हते. अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती एकत्रित करण्यात आली. परिसरातील सर्वच सीसीटीव्ही तपासण्यात आले. अखेर, एका सीसीटीव्हीत पाच इसम संशयितरीत्या फिरताना आढळून आले. तांत्रिक पद्धतीने अधिक तपास केल्यानंतर, यातील एक आरोपी वाघोली परिसरातून आल्याचे समजले. तेथे तपास केल्यानंतर एका दुकानदाराने तो आरोपी ओळखला. गुन्हा झाल्याच्या घटनेपासून तो हरयानात गेल्याची माहिती पुढे आली. मग एक स्वतंत्र पथक हरयानाला पोहोचले. महिन्याभराच्या तपासानंतर त्यांना कसेबसे दोन आरोपी सापडले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्हा कबुल केला. सात जणांनी मिळून कट केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यासाठी गर्दी, सीसीटीव्ही, सायरन आदींची कशी टेहळणी केली, दरोडय़ाचे नियोजन कसे केले, दुचाकी गाडय़ा कुठून चोरल्या, अशी सर्वच माहिती त्यांनी दिली. अटक झालेल्या दोन आरोपींकडून ९० लाखांपैकी २३ लाखांचा ऐवज आणि गुन्ह्य़ात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी मात्र फरार आहे. त्याचे अन्य सहकारी अजूनही मोकाटच आहे. संपूर्ण घटनाक्रमात नाटय़मय वळणे आहेत. बरेच दिवस तपास रखडल्यावरून पोलिसांवर टीका होऊ लागली होती. मुख्य आरोपी तूर्त सापडणे अवघड असल्याची खात्री पोलिसांना वाटू लागली होती. प्रसारमाध्यमांचा तगादा सुरूच होता. त्यामुळे तपासात जे काही हाती आले, ते पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याची आणि नकारात्मक बातम्यांचा मारा थांबवण्याची घाई पोलीस अधिकाऱ्यांनी केली. अजूनही मुख्य आरोपी आणि इतर ऐवज ताब्यात यायचा आहे. पोलीस तपास सुरू आहे, असे साचेबद्ध उत्तर पोलिसांकडून दिले जात आहे.

गांजाविक्रीचे गौडबंगाल

पिंपरी-चिंचवड शहरासाठी १५ ऑगस्ट २०१८ पासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले, तेव्हा सगळं काही आलबेल होईल आणि गुन्हेगारी कारवायांना आळा बसेल, असा विश्वास सर्वसामान्यांना वाटत होता. प्रत्यक्षात तसे काहीच होत नसल्याचे गेल्या आठ महिन्यांतील गुन्हेगारी घटना पाहता स्पष्टपणे दिसून येते. खुनांचे सत्र सुरूच आहे. तोडफोडीच्या आणि हाणामारीच्या घटना कमी होताना दिसत नाही. महिला अत्याचारासह इतरही गुन्ह्य़ांचे प्रमाण जैसे थे आहे. पूर्वीही बेकायदा पद्धतीने शहरात गांजाची विक्री होत होती. त्यात कोणताही खंड पडलेला नाही. अलीकडच्या काही दिवसांमध्ये भोसरीत ३० किलो गांजा पकडण्यात आला. निगडीतील दोन स्वतंत्र घटनेत १२ किलो, पिंपरीत २१ किलो, चिंचवडला १६ किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला. रविवारी भोसरीत झालेल्या कारवाईत पुन्हा २७ किलो गांजा पकडण्यात आला. सातत्याने शहरात गांजा आणला जातो आणि त्याची राजरोसपणे विक्री केली जाते. यातील आरोपी पोलिसांना मिळत नाहीत. जे आरोपी सापडतात, त्याचे प्रमाण कमी आहे. खुलेआम धंदा करणारे जास्त आहेत, हे अनाकलनीय आहे. मुंबई आणि परराज्यातून हा माल शहरात आणला जातो. सध्या त्याला खूपच मागणी असल्याचे सांगण्यात येते. नियोजनबद्ध काम करणारी साखळी यात आहे. महिलांचा सहभाग चिंताजनक आहे. नुकतेच एका ६५ वर्षीय महिलेला अमली पदार्थाची तस्करी करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. एकूणात परिस्थिती गंभीर आहे. आता शाळामहाविद्यालयात विद्यार्थ्यांपर्यंत गांजा पोहोचला आहे. आतातरी गांजाचे आतबटय़ातील व्यवहार कुठेतरी थांबले पाहिजे. पोलिसांनी कागदी घोडे नाचवण्यापेक्षा दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.