‘ब्रेन डेड’ रुग्ण म्हणजे काय.. मृत रुग्णाचे अवयवदान केल्यास मृतदेह विद्रूप दिसेल का.. जिवंत व्यक्ती अवयवदान करू शकते का..असे अवयव दान केल्यावर त्या व्यक्तीस काही त्रास तर होणार नाही.. अवयवदानासंबंधीचे हे असंख्य प्रश्न! या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी चालण्याच्या उपक्रमातून केला. निमित्त होते ‘पुणे डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे (पीडीसीटी) रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉकेथॉन’चे.
राज्य शासनाच्या अवयवदान जनजागृती मोहिमेची ‘ब्रँड अँबॅसडर’ जूही पवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप, उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भुतकर, पीडीसीटीचे अध्यक्ष डॉ. संताजी कदम, डॉ. गिरीश कामत, विश्वजित चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.
‘अवयवदान केल्यामुळे मला कोणताही त्रास झाला नाही. याबद्दल समाजात असलेली भीती निर्थक आहे,’ असे जूहीने सांगितले. ‘ब्रेन डेड’ रुग्णाचे अवयव दान करताना कराव्या लागणाऱ्या कायदेशीर बाबींमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने संसदेत प्रश्न मांडणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.