काय चाललंय  प्रभागात ?

प्रभाग क्रमांक २ चिखली गावठाण-कुदळवाडी-बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी

मोशी आणि लगतचा परिसर म्हणजे ‘मराठा-माळी’ समाजातील वर्चस्ववाद, तो या प्रभागात प्रकर्षांने दिसून येतो. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या या पट्टय़ात भाजपचे वारे वाहू लागल्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचा लक्षवेधी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. भाजपशी सलग्न आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यातील शह-काटशहाच्या राजकारणात बऱ्याच जणांचे सँडविच झाले असून युतीच्या निर्णयावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे.

चिखली गावठाणचा काही भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज्य रेसिडेन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडे वस्ती, वुडस् व्हिला, राजे शिवाजीनगर, कुदळवाडीचा काही भाग व इंद्रायणी नदीपर्यंतचा परिसर असे नव्या प्रभागाचे क्षेत्र आहे.  गावठाण परिसर, सोसायटय़ा व वाडय़ा वस्त्यांचा हा भाग सप्टेंबर १९९७ मध्ये िपपरी पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील आहे. सर्वसाधारण गटातील दोन जागा, सर्वसाधारण महिला व ओबीसी महिला गटासाठी प्रत्येकी एक जागा आहे.

शिवसेनेची ताकद लक्षणीय असली तरी या प्रभागात ‘भाजप विरूद्ध राष्ट्रवादी’ असा ‘सामना’ आहे. खुल्या गटात माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांच्यासह विद्यमान नगरसेवक अरूण बोऱ्हाडे व राहुल जाधव आपले भवितव्य आजमावून पाहत आहेत. आमदार महेश लांडगे यांच्यासोबत भाजपमध्ये आलेले आणि पूर्वीपासून भाजपमध्ये असलेले असे दोन गट पक्षात आहेत, त्यांच्यात सुप्त संघर्ष आहे. लांडगे येण्यापूर्वीच शरद बोऱ्हाडे भाजपमध्ये आले. बोऱ्हाडे यांना विलास लांडे समर्थक म्हणून ओळखतात. लांडगे-लांडे यांच्यातील वितुष्ट पाहता एकाच पक्षात असूनही बोऱ्हाडे-लांडगे यांच्यात सुसंवाद होण्याची शक्यता नाही. लांडगे उमेदवारी मिळू देणार नाहीत, अशी धास्ती बोऱ्हाडे यांना असावी, म्हणून ते पर्यायाच्या शोधात आहेत. तर, बोऱ्हाडे यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्याच्या दृष्टीने विलास लांडे प्रयत्नशील आहेत. बोऱ्हाडे यांच्या घरी अजित पवार यांची लांडे यांनी भेट घडवून आणल्यानंतर या चर्चेला आणखी जोर चढला आहे. ‘एचए’ कंपनीच्या माध्यमातून वर्षांनुवर्षे संघटनात्मक काम करणारे ‘स्वीकृत’ अरूण बोऱ्हाडे यंदा थेट आखाडय़ात उतरू पाहत आहेत. शरद बोऱ्हाडे राष्ट्रवादीत आल्यास अरूण बोऱ्हाडे यांची अडचण होऊ शकते. मात्र, ते भाजपचे उमेदवार राहिल्यास अरूण बोऱ्हाडे यांना संधी मिळू शकते.

मनसे सोडून लांडगे यांच्यासमवेत भाजपमध्ये आलेल्या राहुल जाधव यांच्या उमेदवारीसाठी लांडगे आग्रही आहेत. राहुल स्वत: व त्यांची पत्नी असे दोन पर्याय त्यांच्यापुढे आहेत. निर्णायक क्षणी अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका साधना जाधव यांना उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा नाही. त्यांना सर्वसाधारण महिला व ओबीसी महिला असे दोन पर्याय आहेत. युतीच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून आहे. जातीचे गणित प्रभावी ठरणार आहे.