News Flash

प्रभागाचे प्रगतिपुस्तक : विकास म्हणजे रे काय भाऊ? गुन्हेगारी आणि अवैध धदे बंद करण्याचे आव्हान

एकीकडे श्रमिकांची दाट लोकवस्ती तर दुसरीकडे उच्चभ्रू लोकांची वसाहत असली तरी ‘विकास म्हणजे रे काय भाऊ’ असा प्रश्न ताडीवाला रोड-ससून रुग्णालय या प्रभागातील नागरिकांना पडला

ताडीवाला रोड-ससून हॉस्पिटल प्रभागामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते.

प्रभाग क्रमांक २० (ताडीवाला रोड-ससून हॉस्पिटल)

नगरसेवक : प्रदीप गायकवाड, ल्लचांदबी हाजी नदाफ, लता राजगुरू , अरविंद शिंदे

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे : ससून रुग्णालय, ताडीवाला रस्ता, पुणे रेल्वे स्थानक, एसटी स्थानक, पीएमपी आगर, जिल्हाधिकारी कार्यालय, पानमळा, ढोले-पाटील रस्ता

विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता

पुणे : एकीकडे श्रमिकांची दाट लोकवस्ती तर दुसरीकडे उच्चभ्रू लोकांची वसाहत असली तरी ‘विकास म्हणजे रे काय भाऊ’ असा प्रश्न ताडीवाला रोड-ससून रुग्णालय या प्रभागातील नागरिकांना पडला आहे. प्रभागातील बकालपणा पाचवीला पूजला गेला आहे. अहोरात्र गजबजलेल्या स्टेशन आणि ताडीवाला रस्ता परिसरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे प्रमाण अधिक असून त्याला प्रतिबंध करण्यामध्ये नगरसेवक कमी पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

पुणे रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आणि पीएमपी स्थानक ही महत्त्वाची ठिकाणे असलेल्या या प्रभागामध्ये परगावहून आणि परराज्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे सतत गर्दी असते. ओला-उबर तसेच पुणे-मुंबई टॅक्सी सेवा या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने नागरिकांची सदैव गजबज असते.

बंडगार्डन रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने ससून रुग्णालयामागच्या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी ही नित्याची झाली आहे.

प्रभागामध्ये ढोले-पाटील रस्त्यावर एकमेव छोटे उद्यान आहे. तर, मुलांना खेळण्यासाठी मैदानाचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना एक तर वाडिया महाविद्यालयाजवळील रमाबाई आंबेडकर उद्यानात तरी जावे लागते. नाही तर थोडय़ा अंतरावर असलेल्या बंडगार्डन उद्यानामध्ये जावे लागते. भाजी मंडईसाठी आरक्षित असलेल्या जागेवर क्षेत्रीय कार्यालय उभारण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगच्या जागेमध्ये भाजीवाले आपला व्यवसाय करतात. त्यामुळे अधिकृत भाजी मंडई नाही या वास्तवावर नागरिकांनी बोट ठेवले.

या प्रभागामध्ये प्रदीप गायकवाड हे राष्ट्रवादीचे असून चांदबी हाजी नदाफ, लता राजगुरू आणि अरविंद शिंदे हे तीन नगरसेवक काँग्रेस पक्षाचे आहेत. हे सर्व नगरसेवक ताडीवाला रस्ता परिसरातील असल्याने प्रभागातील उर्वरित भागाकडे त्यांचे दुर्लक्ष होते, अशी नागरिकांची व्यथा आहे. तर, करोना प्रादुर्भावामुळे जवळपास वर्षभर विकासकामे ठप्प असल्याचा फटका बसला असे नगरसेवकांनी सांगितले.

या प्रभागामध्ये विविध ठिकाणी कचऱ्याची समस्या जाणवते. नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकण्याची सवय लागली असल्यामुळे ही समस्या कोणीच दूर करू शकणार नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. सर्व नगरसेवक केवळ आपल्या भागापुरताच विचार करतात. त्यामुळे प्रभागाच्या र्सवकष विकासाचा विचार होताना दिसत नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.

नगरसेवकांचे दावे :

करोनामुळे विकासकामांसाठी निधी देता आला नाही.

वैद्यकीय सुविधांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी उपाययोजनांची कार्यवाही सुरू

न्यायप्रविष्ट बाबींमुळे झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबित

नागरिक म्हणतात

चार नगरसेवक असले, तरी एकत्रित विचार करून प्रभागामध्ये विधायक विकासकामे झाली असे छातीठोकपणे म्हणणे धाडसाचे ठरेल. प्रभागामध्ये विकास कामांचा विचार हा केवळ नगरसेवकाचे घर असलेल्या परिसराचा केला जातो. कचरा समस्येवर तोडगा काढण्यामध्ये लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत. विकास कामांचा पत्ता नसलेल्या या प्रभागामध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे. प्रायव्हेट रस्त्यावरील खड्डे दूर करावेत असे कोणालाही वाटत नाही.

– अ‍ॅड. सचिन लंके

देशाच्या स्वातंत्र्यापासून या भागातील बकालपणा दूर करावा असे कोणालाही वाटले नाही. उनागरिकांच्या दैनंदिन समस्या दूर करण्याचे काम महापालिका प्रशासन करत असते. नगरसेवकांनी प्रभागामध्ये विकास कामे करावीत, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. हातावर पोट असलेल्या प्रभागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा लागल्या, तर रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याइतकी त्यांची ऐपत नसते.

– धनंजय कांबळे

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

शिधापत्रिका, पॅनकार्ड काढून देणे आणि दवाखान्याचे बिल कमी करून देणे एवढीच कामे तीही कमिशन तत्त्वावर केली जातात. शासनाच्या विविध योजनांद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना गैरमार्गाला लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. युवकांना संगणक प्रशिक्षण देऊन त्यांची शैक्षणिक पात्रता वाढविण्यसाठी प्रयत्न होत नाहीत.

– संतोष सोनवणे, शिवसेना

‘सर्वाची जबाबदारी म्हणजे कोणाचीच जबाबदारी नाही’ या उक्तीनुसार या प्रभागामध्ये चारही नगरसेवकांचे कामकाज चालते.  भवानी पेठेमध्ये ७० टक्के झोपडपट्टीचा भाग आहे. कचरा साफसफाई, मैलापाणी वाहिनी बदलणे या समस्या तशाच आहेत. बेरोजगारी ही येथील मूलभूत समस्या असून त्याकडे कोणाचेही लक्ष नाही हे वास्तव आहे. विकास शेकडो मैल दूरच आहे.

– हिरामण शिंदे, भाजप

तक्रारींचा पाढा

प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या

पाण्याचा प्रश्न प्रलंबित

वाहतूक वर्दळीचा त्रास

झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रश्न अनिर्णीत

लोकप्रतिनिधी म्हणतात

राजेवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यशस्वीपणे राबविला. तेथील जलवाहिनी, मैलापाणी वाहिनी आणि कचऱ्याची समस्या सोडविण्यात आली असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न केले. भवानी पेठेतील जुना गाडी अड्डा येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम प्रगतिपथावर आहे. प्रभागामध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे  रहदारीचा प्रश्न सुटला आहे.

– प्रदीप गायकवाड, नगरसेवक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सीमाभिंतीचे सुशोभीकरण करण्यात आले असून सोहराव चौकात भव्य कमान उभारून रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. शहरातील पहिल्या झोपडपट्टीमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. जनता विद्यालय आणि सजनाबाई भंडारी शाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पंचशील चौकात डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात येत आहे.

– चांदबी नदाफ, नगरसेविका

प्रभागातील गल्ली-बोळांचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून नागरिकांच्या सोयीसाठी जलवाहिनी आणि मैलापाणी वाहिनी बदलण्याची कामे करण्यात आली आहे. स्थायी समिती सदस्य या नात्याने मिळालेला निधी विकास कामांवर खर्च करण्यात येत आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन दफनभूमीचा प्रश्न सोडविला असून कैलास स्मशानभूमीमध्ये आधुनिक सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.

– लता राजगुरू, नगरसेविका

शाहू उद्यान आणि शाहू जलतरण तलावाचे नूतनीकरण करण्यात आले असून युवकांसाठी क्रिकेट अकादमी सुरू करण्यात आली आहे. ताडीवाला रस्ता परिसरात पाण्याची समस्या गंभीर असून भामा-आसखेडचे पाणी मिळाले तरी पाणीपुरवठा कमी पडणार आहे. दैनंदिन कचऱ्यामध्ये उपाहारगृहांच्या कचऱ्याची पडणारी भर कमी करण्यासाठी कचऱ्याचे विघटन करण्याची प्रक्रिया राबविण्यावर भर दिला जात आहे.

– अरविंद शिंदे, नगरसेवक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 1:52 am

Web Title: ward no 20 tadiwala road dd 70
Next Stories
1 घराचा पाया खोदताना पुरातन सोन्याची नाणी आढळली
2 अधिकाधिक दस्त नोंदणी ऑनलाइन होण्यासाठी विविध उपाययोजना
3 परीक्षा नियोजनासाठी शासनाकडून समिती स्थापन
Just Now!
X