प्रभागाचे प्रगतिपुस्तक

कोरेगाव पार्क-घोरपडी

प्रभाग क्रमांक २१

प्रथमेश गोडबोले

कोरेगाव पार्क-घोरपडी (प्रभाग क्रमांक – २१) हा प्रभाग ताडीवाला रस्ता, कोरेगाव पार्क, घोरपडीपासून सोलापूर रस्त्यावरील मिरेकर वस्तीपर्यंत विस्तारलेला आहे. अतिउच्चभ्रू आणि अत्यंत गरीब अशी टोकाची राहणीमान असलेले नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. काळानुसार घोरपडी गाव बदलले आणि नागरीकरणाच्या रेटय़ात सार्वजनिक शौचालये, रखडलेले रस्ते रुंदीकरण, रखडलेला घोरपडी उड्डाण पूल, कचरा, अपुरी शासकीय आरोग्य यंत्रणा अशा अनेक समस्यांनी हा परिसर त्रासला आहे. तर, कोरेगाव पार्क हा अतिशय विकसित उच्चभ्रू भाग असल्याने या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल, पब, मोठी गृहनिर्माण संकु ले, बंगले आहेत. वाहतूककोंडी, वाहनतळ, विकासकामांच्या नावाखाली मोठय़ा के लेल्या पदपथांमुळे झालेले अरुंद रस्ते अशा समस्या या भागात आहेत.

घोरपडीचा काही भाग पुणे महापालिका आणि काही भाग पुणे कटक मंडळात समाविष्ट आहे. छोटय़ा गल्ल्या, लहान घरे असल्याने स्वतंत्र आणि स्वच्छ सार्वजनिक शौचालयांची गरज आहे. गेल्या साडेतीन वर्षांत प्रभागात एकही भरीव काम करता आलेले नाही, नगरसेवक नवखे असल्याने प्रशासनाकडून चांगल्या दर्जाची आणि वेळेत कामे करून घेता येत नाहीत, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांच्या आहेत. प्रभागात चार बुद्धविहार आणि रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामेही झालेली नाहीत.

पावसाळ्यात कोरेगाव पार्क परिसरातील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप येते. गटारे तुंबल्याने साउथ मेन रोडवरील दुकाने, सोसायटय़ांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार पावसाळ्यात होतात. तसेच या परिसरातील विविध गल्ल्या, साउथ आणि नॉर्थ मेन रोड या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. अरुंद रस्त्यांवरील पदपथ मोठे करण्यात आल्याने रस्ते आणखी छोटे झाले आहेत. उच्चभ्रू भाग असल्याने या ठिकाणी हॉटेल, पब, ओशो आश्रम या ठिकाणी देशी-परदेशी पर्यटक नेहमीच येतात. वाहनांच्या तुलनेत वाहनतळांची संख्या अपुरी असल्याने रस्त्यांवरच वाहने लावली जातात. परिणामी वाहतूककोंडीत भरच पडत आहे. अनेक बेकायदा व्यवसाय राजरोसपणे चालतात. त्याचाही त्रास स्थानिक नागरिकांना मोठय़ा प्रमाणात होतो.

हिमाली कांबळे, लता धायरकर, मंगला मंत्री आणि उमेश गायकवाड हे चौघेही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत.

नगरसेवक

* हिमाली कांबळे

* लता धायरकर

* मंगला मंत्री

* उमेश गायकवाड

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

ताडीवाला रस्ता, लडकत वाडी, बोट क्लब रोड, अतुल पार्क, नॉर्थ मेन रोड, साउथ मेन रोड, बी. टी. कवडे रस्ता, विकास नगर, आगवाली चाळ, भीमनगर

नगरसेवकांचे दावे

* मैलापाणी, पावसाळी वाहिन्या, पथदिवे, रस्ते काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण

* उद्यान, खुली व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅकची कामे प्रस्तावित

* घोरपडी उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर, मगरपट्टा-मुंढवा उड्डाण पूल पूर्ण

* प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन

* वस्ती भागात पायाभूत सुविधांचे जाळे

नागरिक म्हणतात

नगरसेवकांनी केलेली कामे चांगली होती. हीच कामे पुढे नेण्यास विद्यमान नगरसेवकांना अपयश आलेले आहे. नॉर्थ मेन रोड परिसरात वाहनतळ होणे आवश्यक असून कोरेगाव पार्क परिसरात वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे. गरज नसताना पदपथ मोठे के ल्याने आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद झाले आहेत.

– अ‍ॅड. राहुल दिंडोकर, कोरेगाव पार्क

घोरपडी पुलाचे काम अतिशय धिम्यागतीने सुरू आहे. बी. टी. कवडे रस्त्यावर ५० हजार लोकसंख्येमागे एकही शासकीय दवाखाना नाही. सार्वजनिक शौचालये प्रभागात अपुरी आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रश्नही गेल्या कित्येक वर्षांपासून कायम आहे. बी. टी. कवडे रस्ता ते मगरपट्टा असा ४० फू ट रस्ता प्रस्तावित असून या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. रिलायन्स फ्रे शसमोरील रस्त्याचे कामही रखडले आहे.

– स्वप्नेश कुंजीर, बी. टी. कवडे रस्ता

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

अंतर्गत वादामुळे प्रभागातील कामे रखडली आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत एकही भरीव काम झालेले नाही. चारही लोकप्रतिनिधी मुंढवा, घोरपडी या भागात वास्तव्याला असल्याने ठरावीक भागाकडेच लक्ष दिले जाते. परिणामी उर्वरित भागातील समस्या नागरिक कोणाला सांगणार?. नवे नगरसेवक असल्याने त्यांना प्रशासन, ठेके दाराकडून चांगली कामे करून घेता आलेली नाहीत. कचऱ्याचे नियोजन नसून माझ्या काळात प्रभागात चार बुद्धविहार केले असून त्यांची देखभाल-दुरुस्तीही केली जात नाही.

– बाबु वागसकर, मनसे

प्रभागासाठी अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याचे कारण देत नगरसेवक विकासकामे करण्यास टाळाटाळ करत आहेत. बी. टी. कवडे रस्त्यावरील क्रीडांगणाची अवस्था बिकट आहे. निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षी काँक्रिट रस्ते फोडून मैलापाणी वाहिन्या टाकण्यात आल्याने चांगले रस्तेही खराब झाले. नगरसेवकांकडून वस्ती भागात सण, उत्सवात भेटवस्तू दिल्या जातात, मात्र पायाभूत सुविधांची कामे के ली जात नाहीत. प्रभागात माझ्या काळात के लेल्या फुटबॉल मैदानाची अवस्थाही बिकट असून आम्ही केलेल्या विकासकामांची देखभाल-दुरुस्तीही होत नाही.

– सुरेखा कवडे, राष्ट्रवादी काँग्रेस</p>

लोकप्रतिनिधी म्हणतात

प्रभागातील वस्ती पातळीवर पथदिवे, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे पूर्ण केली आहेत. बी. टी. कवडे रस्त्यावरील क्रीडांगण परिसरात महिलांसाठी शौचालय उभारणी केली असून करोनामुळे गेल्या वर्षी पूर्ण होऊ शकणारी खुली व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, उद्यान ही कामे प्रस्तावित आहेत. प्रभागातील औद्योगिक परिसरात पथदिवे, रस्ते काँक्रिटीकरण, डांबरीकरण, मैलापाणी वाहिन्या, कामे पूर्ण केली आहेत.

– हिमाली कांबळे, नगरसेविका

कस्तुरबा गांधी शाळेचे विस्तारीकरण पूर्ण केले. घोरपडी उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. भीमनगर येथील दवाखान्याचे विस्तारीकरण होत असून दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर प्रसूतिगृह उभारण्यात येत आहे. श्रावस्तीनगर येथे स्वखर्चातून पोलीस चौकी उभारली आहे. शिंदे वस्ती येथे तीन मजली इमारतीमध्ये अभ्यासिका, संगणक ओळख क्लास, सभागृह उभारले आहे.

– लता धायरकर, नगरसेविका

श्रावस्तीनगर येथे जिजाऊ संकुल उभारले असून योग, जिम्नॅशियम सभागृहासाठी चार कोटी निधी खर्च केला आहे. रेणुका वस्ती येथे गेल्या २५ वर्षांपासून विद्युत व्यवस्था नव्हती, ती उभारली आहे. प्रभागात नवे अग्निशमन के ंद्र तीन कोटी खर्चून उभारले जात असून लवकरच पूर्ण करू. पिंगळे वस्ती रस्ता वादात अडकला होता. या रस्त्याचे काम मार्गी लावून वाहतूकही सुरू झाली आहे.

– मंगला मंत्री, नगरसेविका

घोरपडी उड्डाण पुलाची मान्यता घेऊन काम सुरू झाले आहे. त्याकरिता १२५ कोटी रुपयांचा निधीपैकी सध्या ४८ कोटींची निविदा काढली आहे. भारत फोर्ज कंपनी परिसरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण के ली आहेत. मगरपट्टा-मुंढवा परिसरातील पुलाचे कामासाठी स्वत: एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रभागातील प्रकल्पबाधित ९६ कु टुंबांना हडपसर येथे घरे दिली आहेत.

– उमेश गायकवाड, नगरसेवक

तक्रारींचा पाढा

*  वाहनतळ, वाहतूककोंडी नित्याची

*  रस्ते रुंदीकरणाची कामे रखडलेली

*  प्रभागातील शासकीय आरोग्य यंत्रणा असक्षम

*  झालेल्या विकासकामांची देखभाल-दुरुस्ती नाही