29 September 2020

News Flash

‘ज्ञानोबा-तुकोबां’च्या सहवासाने पुण्यनगरी आनंदली!

पहाटे परंपरेची महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले.

पादुकांचे दर्शन घेऊन धन्य-धन्य होण्याचे भाग्य मिळविण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी. (सर्व छायाचित्रे- तन्मय ठोंबरे) 

वैष्णवांचा भक्तिभाव अन् पुणेकरांचा सेवाभाव,  दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या आज निघणार

वैष्णवांच्या विठ्ठल घोषाने,

आली भरती भक्तीच्या सागरी..

‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या सहवासाने,

आनंदून गेली अवघी पुण्यनगरी.!

सावळ्या परब्रह्माच्या भेटीची आस घेऊन विठ्ठलनामाचा अखंड घोष करीत पंढरीच्या वाटेवर असलेल्या लाखो वैष्णवांसह दाखल झालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पालख्यांच्या मुक्कामाने शहराचे वातावरणच बदलून टाकले. ज्ञानोबा-तुकोबाचा सहवास लाभल्याने पुण्यनगरीला भक्तीचे भरतेच आले अन् अवघी नगरी आनंदून गेली. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी गुरुवारी दिवसभर पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. एकीकडे वैष्णवांचा भक्तिभाव होताच, पण त्याला पुणेकरांनी सेवाभावाची जोड दिली. नानाविध उपक्रम राबवत संस्था, संघटना, मंडळे व वैयक्तिकपणे नागरिकांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.

बुधवारी संध्याकाळी पालख्यांचे आगमन झाल्यापासूनच शहरात जणू भक्तीचा संचार झाला होता. माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी गेल्यापासूनच त्या ठिकाणी पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पालख्यांसोबत आलेले वारकरी शहराच्या विविध भागात मुक्कामी होते. त्यामुळे मंदिरांच्या परिसराबरोबरच वारकरी मुक्कामी असलेल्या प्रत्येक भागामध्ये भक्तिचैतन्याचीच अनुभूती मिळत होती. टाळ-मृदंगांचा गजर व अभंगाच्या सुरांनी वातावरणात प्रसन्नता होती.

रात्री पालख्यांसमोर मानाचे कीर्तन झाले. त्यानंतर पहाटे परंपरेची महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. भल्या पहाटेपासूनच भाविकांनी निवडुंगा विठ्ठल मंदिर व पालखी विठोबा मंदिराच्या आवारात रांगा लावल्या होत्या. मंदिरांच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. मंदिर परिसर व रस्तेही कमानींनी सजविण्यात आले होते. महिला, वृद्ध, लहान मुले व तरुणही दर्शनाच्या ओढीने मंदिरांकडे येत होते. भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे व कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज होती. पालख्यांचा मुक्काम असणारे मंदिर व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत होती. संध्याकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी कायम होती.

वारकऱ्यांसाठी विविध सेवा-सुविधा

आळंदीहून निघालेल्या ५५ दिंडय़ांना कसबा पेठेतील राजस सोसायटी व मित्र परिवाराच्या वतीने ४५० प्रथोमोपचार पेटय़ांचे वाटप करण्यात आले. साईनाथ मित्र मंडळ व कोकणवासीय रहिवासी संघ तसेच कोथरूड डॉक्टर फोरमच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा व औषध वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील दुधभाते नेत्र रुग्णालय व आदित्य फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र, मोतीिबदू व रोटिनाची तपासणी करण्यात आली. नाना पेठेतील श्री शिवराज तरुण मंडळ व फोरसाइट महाविद्यालयाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन व श्रद्धा सायबर कॅफेच्या वतीने आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले. स्माइल्स ऑर्थोडॉटिक केअरच्या वतीने दंतचिकित्सा करण्यात आली. गणराज प्रतिष्ठान व शिवाजीनगर विधानसभा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली. बिबवेवाडी येथे जय भवानी मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने चहापान व गुडदाणी वाटप करण्यात आले. शिवनेनेच्या वतीने भवानी पेठ येथे वारकऱ्यांना इरले वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आरोग्य तपासणीही करण्यात आली. संत निरंकारी मंडळाच्या खडकी शाखेच्या वतीने वारकऱ्यांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली.

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलभक्ती

माउली व तुकोबांच्या पादुकांवर डोके टेकवून अलौकिक सुखाची अनुभूती घेण्यासाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी असली, तरी दुसरीकडे वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलभक्ती मानून काम करणाऱ्यांची संख्याही मोठी होती. पालख्यांचे शहरात आगमन झाल्यापासूनच अनेकांची ही सेवाभावी वृत्ती दिसून येत होती. वारकऱ्यांसाठी नाश्ता, भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्था, संघटना व मंडळांनी पुढाकार घेतला. त्यामुळे अनेक ठिकाणी जेवणाच्या पंगती व वारकऱ्यांना आग्रहाने वाढणारी मंडळी दिसून येत होती. सार्वजनिक ठिकाणांबरोबरच अनेक नागरिकांकडून वारकऱ्यांसाठी आपापल्या घरातही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मोफत दाढी, कपडय़ांची शिलाई, चपला व छत्री दुरुस्ती, आरोग्य तपासणी, औषधांचे वाटप आदी उपक्रमही शहरभर मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात आले.

आज पालख्यांना निरोप

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या उद्या (१ जुलै) सकाळी शहरातून मार्गस्थ होणार आहेत. तुकोबांच्या पालखीचा दुपारी हडपसर येथे मुक्काम असून, त्यानंतर पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामी जाणार आहे. माउलींची पालखी उद्या दिवेघाटाच्या अवघड वाटेवरून मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर पालखी सासवड मुक्कामी जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 5:48 am

Web Title: wari palkhi in pune
Next Stories
1 महिला संघटना डॉ. वैशाली जाधव यांच्या पाठीशी
2 पिंपरीच्या नियोजित पोलीस आयुक्तालयासाठी प्राधिकरण कार्यालयाची जागा?
3 ‘विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका’
Just Now!
X