पाणीपुरवठा योजनांमधील गळती हा पुण्यात नेहमीच चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरतो; पण वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रात कार्यान्वित करण्यात आलेल्या नव्या यंत्रणेमुळे खराब झालेले जे पाणी पूर्वी नाल्यात सोडले जायचे ते शुद्ध करून पुन्हा वापरात आणले जात आहे. असे तीस लाख लिटर पाणी वाचवण्यात वारजे केंद्राला यश आले आहे.
वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता प्रतिदिन शहाऐंशी दशलक्ष लिटर एवढी असून जलशुद्धीकरण केंद्रात विविध प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी वारजे, कोथरूड, बावधन, पाषाण, बालेवाडी, गोखलेनगर वगैरे भागांमध्ये पाठवले जाते. शुद्धीकरण प्रक्रियेत विविध टाक्यांमध्ये जे फिल्टर वापरले जातात त्यात पाण्यातील गाळ तसेच अशुद्ध घटक अडकतात. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया झाल्यानंतर फिल्टरचे बेड पाण्याच्या मोठय़ा दाबाने धुतले जातात. त्या प्रक्रियेमुळे फिल्टर बेडमध्ये अडकलेली सर्व घाण निघून पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हे बेड पुन्हा स्वच्छ होतात. फिल्टर बेड धुतल्यानंतर जे अस्वच्छ पाणी बाहेर पडते ते आतापर्यंत जवळच्या नाल्यात सोडले जात असे.
या प्रक्रियेत आता बदल करण्यात आला आहे. बेड धुतल्यानंतरचे हे पाणी नाल्यात न सोडता ते पुन्हा वेगळ्या टाकीत एकत्र केले जाते आणि त्यावर काही प्रक्रिया करून ते पुन्हा शुद्धीकरण प्रक्रियेसाठी पाठवले जाते. त्यामुळे या पाण्यावर प्रक्रिया होते आणि ते पुन्हा शुद्ध केले जाते. या नव्या पद्धतीत जलकेंद्रातील तीस लाख लिटर पाणी पुन्हा गोळा केले जात असून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. एवढे सर्व पाणी पूर्वी सोडून दिले जात असे त्याचा आता पुन्हा वापर होत आहे.
वारजे येथील सध्याच्या केंद्राची क्षमता वाढवून त्याची जलशुद्धीकरण क्षमता प्रतिदिन एकशे शहाऐंशी दशलक्ष लिटर करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. त्याबरोबरच या ठिकाणी प्रतिदिन दोनशे दशलक्ष लिटर क्षमतेचे नवे केंद्रही उभारले जात आहे. या केंद्राचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती नगर अभियंता प्रशांत वाघमारे आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. या नव्या प्रकल्पासाठी खडकवासला धरण ते वारजे दरम्यान डाव्या तीरावरून नऊ किलोमीटर लांबीची नवी जलवाहिनी टाकण्यात येत असून त्या जलवाहिनीद्वारे खडकवासला येथून थेट वारजे केंद्रात पाणी आणले जाईल. या नव्या केंद्राची उभारणी व पुढील पाच वर्षांची देखभाल दुरुस्ती यासाठी महापालिकेला साठ कोटी रुपये खर्च येणार आहे.