संगीतोन्मेष पुणे व आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने चिंचवडला १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात धार्मिक क्षेत्रातील दिग्गजांचा सहभाग राहणार आहेत.
चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ मृदंगाचार्य पं. उद्धव बापू आलेगावकर अध्यक्षस्थानी राहणार आहेत. महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, डॉ. रामकृष्ण लहवितकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, आळंदीच्या माऊली संस्थानचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव मोहिते, चिंचवड देवस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र देव, संगीतकार पं. यादवराज फड आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने ग्रंथिदडी काढण्यात येणार आहे.
उद्घाटनानंतर कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, केतकी माटेगावकर व ज्ञानेश्वर मेश्राम यांचा ‘भक्तिसंगीत’ कार्यक्रम होणार आहे. याशिवाय भजनमहोत्सव, आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या हस्ते प्रवचनकार व दिंडीप्रमुखांचा सत्कार, संगीत विशारद राधाकृष्ण गरड यांचा ‘भक्तिरंग’, उद्धव आपेगावकर यांचा ‘मृदंग सोलो’ व प्रकट मुलाखत, लक्ष्मण राजगुरू यांचे ‘भारूड’, मध्य प्रदेशातील ज्येष्ठ कलाकार प्रल्हाद टिपानिया यांचा ‘कबीर बानी’ आदी कार्यक्रम होणार आहेत. राजस्थानच्या आनंद वैद्य यांचा संतवानी, चंद्ररंग वैष्ण विचार पुरस्कारांचे वितरण, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांचे ‘भक्तिसंगीत’ तसेच, शेवटच्या सत्रात पं. फड आणि सहकारी ‘भक्तिस्वर गंध’ सादर होणार आहेत.